
धाराशिव – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मावळा प्रतिष्ठानच्यावतीने धाराशिव येथे एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. समाजसेवेचा आदर्श ठेवत, या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल २४३ मावळ्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक मावळ्याचा ‘वर्दीचा राजमार्ग’ हे पुस्तक आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. ‘वर्दीचा राजमार्ग’ हे पुस्तक विशेषतः पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. अशा स्वरूपाची भेट ही फक्त सन्मानापुरती न राहता, त्यांच्या भविष्यातील यशासाठी एक प्रेरणास्त्रोतही ठरेल.
मावळा प्रतिष्ठान गेली दोन वर्षे सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे. सामाजिक भान जपत आणि युवकांमध्ये राष्ट्रप्रेम जागवण्याचा उद्देश ठेवत प्रतिष्ठान विविध उपक्रम राबवत आहे.
या कार्यक्रमाला मावळा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी या उपक्रमात भाग घेतलेल्या सर्व मावळ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.