
नूतन पोलीस अधीक्षक रितू खोकर ॲक्शन मोडवर
धाराशिव : – गेल्या वर्षभरापासून धाराशिव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात चोरी करुन दहशत मजविणाऱ्या चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला होता. मात्र, ते दरोडेखोर पोलिसांना हुलकावणी देऊन फरार होत होते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते निर्माण झाले होते. मात्र नूतन पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी पदभार स्वीकारून या दरोडेखोरांचा बिमोड करण्याचे काम हाती घेतले. त्यांनी पोलिसांना तसे आदेश दिले. त्यामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली असून त्यांनी अट्टल दरोडेखोर असलेल्या टोळीच्या म्होरक्याला जेरबंद करुन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्याच्या ताब्यातून चोरी केलेले ८ तोळे सोने तसेच चोरीसाठी वापरीत असलेली मोटरसायकल असा एकूण ३ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने देखील पोलीस अधीक्षक खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडेखोरांना शोधून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या प्लॅन हाती घेतला आहे.
जिल्ह्यातील मालाविषयी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लातूर तालुक्यातील मुरुड येथील कृष्णा ऊर्फ पिंटु खडेल शिंदे याने धाराशिव जिल्ह्यातील चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे केलेले आहेत. तसेच तो आता कळंब तालुक्यातील वाठवडा शिवारात एका हॉटेल समोर थांबलेला आहे. त्यावरून त्या पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे जावून आरोपीचा शोध घेतला असता आरोपीस पोलीसांचा संशय येताच आरोपीने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. परंतू पथकातील पोलिसांनी अतिशय शिताफीने पाठलाग करून आरोपी शिंदे यास पकडून ताब्यात घेतले. त्याला धाराशिव येथील स्थानिक गुन्हे शाखेत आणून नमुद गुन्ह्यांच्या अनुषंगाने विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर दोन साथीदारांसह मिळून धाराशिव शहर, ढोकी, वाशी, परंडा, लोहारा, आनंदनगर आणि धाराशिव ग्रामीण या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील एक वर्षापासून अनेक घरफोड्या केल्या असल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्याने सांगीतले की, प्रत्येक गुन्हा केल्यानंतर आम्ही मिळालेल्या सोन्याचे दागीने किंवा पैसे याची वाटणी करीत होतो. त्यामधून माझ्या वाटणीला आलेले सोन्याचे दागीने हे मी राहत असलेल्या मुरूड येथील घरी ठेवले आहेत. मला ते दागीने विकून मुरूड येथे प्लॉट घेवून घर बांधायचे होते असे सांगितले. शिंदेंच्या ताब्यातून साडे आठ तोळ्यांचे (८४ ग्रॅम) सोन्याचे दागीने व गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल असा ३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर पुढील कार्यवाहीसाठी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपी शिंदेला आनंद नगर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. त्यांच्याकडून धाराशिव जिल्ह्यातील घरफोडीचे एकूण १५ गुन्हे उघड केले आहेत. ही कामगिरी पोलीस अधिक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, अंगुलीमुद्रा शाखेचे सपोनि सुधीर कराळे, पोलीस हवालदार विनोद जानराव, प्रदीप वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, योगेश कोळी, अंगुलीमुद्रा शाखेचे पोलीस हवालदार मनोज जगताप, चालक पोलीस हवालदार महेबुब अरब, प्रकाश बोईनवाड, विनायक दहीहंडे यांचा पथकाने केली आहे.