
धाराशिव – धाराशिव शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेतून शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एक आरोपी गांजासह अटक केला असून, पाच जणांना गांजाचे सेवन करताना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री 10.11 वाजता धाराशिव ते बार्शी रस्त्यावरील भोसले हायस्कूलसमोरील थोरात इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या मागील भागात करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी आरोपी कुणाल अनिल पवार (वय 30, रा. भोसले हायस्कूल, तांबरी विभाग, धाराशिव) याला अटक केली. त्याच्याकडून शासनाने प्रतिबंधित केलेला सुमारे 2 किलो 50 ग्रॅम वजनाचा, किंमत अंदाजे 41,000/- रुपये असलेला गांजा, रोख रक्कम 6,000/- रुपये व 200/- रुपये किंमतीचा वजन काटा असा एकूण 47,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच याच ठिकाणी अंमली पदार्थ गांजाचे सेवन करताना जिशान अली साहेब अली, विपुल दिप, शाहरुख दावल मुजावर, आणि ओमकार दिलीप शिंदे या चार इसमांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध NDPS कायदा कलम 8(c), 20(b)(ii)(A), 27 अन्वये गुन्हा नोंदवला असून, धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 271/2025 नोंदविण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शकील शेख, सपोनि दिनेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ यांच्यासह पोलीस अंमलदार – पोह सुतार,हुसेन सय्यद,एस डी पी ओ कार्यालय, गलांडे, चक्रधर पाटील, पोलीस अंमलदार जमादार, मुगळे, ज्ञानेश्वर माळी, जाधवर, घुगे, महिला पोलीस अंमलदार आरती ढवारे पोलीस अंमलदार आदींच्या पथकाने केली.
धाराशिव पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थांच्या विरोधात एक कठोर पाऊल मानले जात असून, शहरात अशा अवैध धंद्यांना आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून आणखी कठोर पावले उचलली जाणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाने दिले आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामांपासून दूर राहावे आणि अशा संशयास्पद हालचाली पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहनही धाराशिव शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.