मुरूम (जि. धाराशिव) – मुरूम पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या एका धक्कादायक घटनेप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कोथळी येथे भेट देऊन तपासाबाबत फीर्यादी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
दिनांक 19 जून 2024 रोजी फीर्यादी नामदेव अंबादास मुगमुळे (रा. कोथळी) यांनी त्यांच्या ८ वर्षीय मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात गुन्हा क्र. 156/2024, भा.दं.वि. कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, 28 जून 2024 रोजी मुलीचा मृतदेह सापडल्याने खुनाचा गुन्हा (कलम 302, 201 भा.दं.वि.) वाढवण्यात आला.
घटनेनंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांच्याकडे तपास सुपूर्त करण्यात आला. मात्र दीर्घ काळानंतरही तपासात प्रगती न झाल्यामुळे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः 13 मे 2025 रोजी कोथळी येथे भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी फिर्यादी, पोलीस पाटील व ग्रामस्थांकडून माहिती घेतली व चौकशी पूर्णपणे पारदर्शक करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश शेलार, मुरूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजीव दहिफळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी आवाहन केले की, या प्रकरणात कोणाकडेही माहिती असल्यास त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, जेणेकरून या प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडता येईल.