
अल्पवयीन मुलाकडे सापडला चक्क गावठी कट्टा !
गावठी कट्टा हाताळणारे वाढते प्रमाण चिंताजनक
धाराशिव – खेळण्यातील बाहुल्या प्रमाणे लहान मुलाच्या हातात जसा नकली पिस्तुलीचा घोडा दिला जातो. अगदी त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या विविध भागात आबाल वृद्धासह कोणीही खरोखरची बंदूक म्हणजेच गावठी कट्टा वापरत असल्याचे चित्र तयार होत आहे. असाच प्रकार ढोकी येथे घडला असून एका अल्पवयीन मुलगा चक्क गावठी कट्टा बाळगत असताना त्याला अटक केली आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली असली तरी खाबऱ्याने दिलेल्या वेळेवरील माहितीमुळे पुढील अनर्थ टळला आहे. गावठी कट्टा हाताळणारी जर अल्पवयीन मुले असतील तर ही बाब सर्वांनाच चक्रावून टाकणारी व अतिशय चिंताजनक आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखान्याच्या समोरील पारधी पेढी येथील एका व्यक्तीकडे अवैध गावठी कट्टा असल्याची खात्रीलायक खबऱ्यामार्फत खबर मिळाली. त्यामुळे पोलीस पथक दि. ९ मे रोजी सकाळी १०.४५ वाजता त्या ठिकाणी गेले असता मिळालेल्या खबरीप्रमाणे एक अल्पवयीन (विधी संघर्ष ग्रस्त) बालक मिळून आला. त्याच्याकडे गावठी कट्ट्याबाबत विचारणा केली असता प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गावठी कट्टा त्याच्या घरामध्ये लपवून ठेवला असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्या घरी दोन पंचासह जाऊन पाहणी केली असता त्याने एका लाकडी कपाटातील गावठी कट्टा पोलीसांना आणून दिला. पोलिसांनी पंचनामा करून १५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त केला आहे. त्या विधी संघर्ष ग्रस्त बालकास जप्त गावठी कट्ट्यासह ढोकी पोलीस ठाण्यात पुढील कारवाईस्तव नेण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण चालक पोकॉ भोसले यांच्या पथकाने केली आहे.