
धाराशिव – तालुक्यातील वाघोली येथे एका शेतजमिनीच्या नावातील फेरफारासाठी ४ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी भूषण वशिष्ठ चोबे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत त्याच्यासोबत खाजगी लिपीक भारत शंकर मगर यालाही अटक करण्यात आली आहे.
तक्रारदाराने त्यांच्या वडिलांच्या शेत गट क्रमांक १५/१० मधील नाव वगळण्यासाठी तहसिल कार्यालय धाराशिव येथे अर्ज केला होता. याबाबत स्थळपाहणी अहवाल तयार करण्यासाठी तलाठी चोबे व त्यांच्या खाजगी लिपीकाने ५,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी करून आज (५ मे) वाघोली येथे सापळा रचण्यात आला. त्यामध्ये तलाठी चोबे यांनी खाजगी लिपीक भारत मगर यांच्या मार्फत तक्रारदाराकडून ४,००० रुपये स्वीकारले. पंचासमक्ष ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
चोबे यांच्या अंगझडतीत सोन्याची अंगठी, चांदीचा कडा, मोबाईल, पेन आणि शासकीय लॅपटॉप मिळून आला. तर खाजगी लिपीककडून लाच रक्कमेसह १०९० रुपये रोख आणि एक साधा मोबाईल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्र.प्र. अधिनियमाच्या कलम १२ व ७(a) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.