
धाराशिव – गोवंश जनावरांची कत्तल व त्यांच्या मास विक्रीस बंदी असताना देखील त्यांची कत्तल करून ते मास विक्रीसाठी खुलेआमपणे नेले जात आहे. मात्र गोमास विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एका टेम्पो चालकास रंगी हात पकडून सव्वा टन गोमासासह टेम्पो वाहन चालकास जेरबंद केले आहे. ही यशस्वी कामगिरी धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख व त्यांच्या टीमने दि. ९ मार्च रोजी केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ मार्च रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांना धाराशिव शहरातील खिरणी मळा येथून गोवंशीय जनावरांचे मांस एका टेम्पोमध्ये विक्रीसाठी घेवून जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डिघोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रशिद पठाण, पोलीस अंमलदार जमादार, मुगळे व बिट मार्शल कर्मचारी यांनी दि. ९ मार्च रोजी १.१५ वाजण्याच्या सुमारास खिरणी मळा येथे अचानकपणे छापा मारला असता तेथे एक हिरव्या रंगाचा टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो क्रमांक (एमएच के ५२५१) या वाहनामध्ये धाराशिव शहरातील फराज गल्लीतील खुर्शीद पाशा शेख (वय ४० वर्ष) हा गोवंशीय मास अंदाजे ११८५ किलो घेऊन जात होता. त्याची २ लाख ३७ हजार रुपये आहे. तसेच २ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो असा एकूण ४ लाख ३७ हजार रुपयांचा माल जप्त केला. त्या वाहन चालका विरुध्द धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये पोहेकॉ पठाण यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम (सुधारित) २०१५ चे कलम ५ (सी), ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनि डिघोळे हे करीत आहेत.