
धाराशिव : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहे. या प्रकरणासह खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडसह ४ आरोपींना अटक केली आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा असल्यामुळे बीडचे पालकमंत्रिपदाच्या शर्यतीतून पत्ता कट होणार आहे. पण त्यांना शेजारीच असलेल्या धाराशिवचे पालकमंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा आहे. पण मराठा संघटनांनी धनंजय मुंडेंच्या पालकमंत्रिपदाला विरोध केला आहे.
धाराशिव जिल्ह्यासाठी धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देऊ नये यासाठी मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रिपदाला विरोध करत आपल्या मागणीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे. ‘बीडचा बिहार झाला, धाराशिवचा बिहार नको’ असं म्हणत धनंजय मुंडे यांना धाराशिवचे पालकमंत्री पद देऊ नका, असं म्हणत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिले जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. बीडनंतर धाराशिव जिल्ह्याचे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देण्यास मराठा समाजाचा विरोध प्रशासनाला निवेदन दिले आहे.
विशेष म्हणजे, बीड हे धाराशिवला लागूनच आहे. बीडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळे महायुती सरकारने धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद देण्यास रेड सिग्नल दिला आहे. पण त्यानंतर त्यांचं नाव हे धाराशिवसाठी चर्चेत आहे. शेजारीच असलेल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळत असल्यामुळे ही राजकीय सोय तर नाही ना, अशी चर्चाही रंगली आहे.
बीडचा पालकमंत्री कोण होणार?
बीडचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्री पदापासून लांब ठेवण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण तसंच अंतर्गत रस्सीखेच म्हणून बीडच्या पालकमंत्री पदी अजित पवार यांची नियुक्ती केली गेली असल्याचे वृत्त समोर आले आहे.