
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निधी वितरणासाठी पाठपुरावा न केल्याने पालकमंत्री प्रताप सरनाईक नाराज; थेट मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांवर गती येण्याऐवजी राजकीय असहमतीचा ब्रेक लागल्याचे चित्र समोर येत आहे. आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या धाराशिवसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत महत्त्वपूर्ण निधी रखडला असून, या प्रकरणी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निधी वितरणासाठी कोणताही पाठपुरावा न केल्याचा ठपका सरनाईक यांनी ठेवला आहे. यामुळे महायुती सरकारमध्ये अंतर्गत मतभेद आणि समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.
धाराशिवसाठी आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना अशा विविध विकास योजनांची कामे रखडली आहेत. निधी वितरणासंदर्भात मंत्रालयीन स्तरावर ३-४ वेळा चर्चा होऊनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या गरजांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
पालकमंत्री सरनाईक यांनी १० जून रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, “अनेकदा पाठपुरावा करूनही निधी वितरित झालेला नाही. इतर जिल्ह्यांमध्ये निधी वितरित झाला असताना धाराशिवला वगळणे दुर्दैवी आहे,” असे नमूद केले आहे. त्यांनी अर्थ व नियोजन विभागाकडेही यासंदर्भात निवेदन पाठवले होते.
सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, निधी वितरणाच्या मुद्यावर तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कुठलाही ठोस पुढाकार घेतलेला नाही. ” आमदारांनी माझ्याशी किंवा मंत्रालयाशी संवाद साधलेला नाही,” असा स्पष्ट उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर महायुतीतील आघाडीतील नेत्यांमध्ये धाराशिवच्या प्रश्नांवर समन्वयाचा अभाव स्पष्ट होत असून, जिल्ह्याच्या विकासावर याचा थेट परिणाम होत आहे.
सरकार कोणती भूमिका घेते आणि स्थानिक आमदार यावर काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.