आषाढी वारीसाठी एसटी महामंडळाची विशेष तयारी; राज्यभरातून ५,२०० विशेष बसेस

Spread the love

पंढरपूर, ११ जून — आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी ५,२०० विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर येथे झालेल्या नियोजन बैठकीत दिली.

राज्याच्या कोणत्याही गावातून ४० किंवा अधिक भाविकांनी बसची एकत्रित मागणी केल्यास त्यांच्या गावातून थेट पंढरपूरकडे जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच विविध खातेप्रमुख उपस्थित होते.

वारकऱ्यांसाठी विविध सवलती लागू
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी शासनाच्या विद्यमान सवलतीही लागू राहणार आहेत. त्यामध्ये ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत मोफत प्रवास, तसेच महिलांसाठी ५० टक्के तिकिट सवलतीचा समावेश आहे.

तपासणी नाके आणि सुरक्षा व्यवस्था
वारीच्या काळात विनातिकीट प्रवास टाळण्यासाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. तसेच २०० सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी २४ तास गस्त घालणार आहेत.

तात्पुरती बसस्थानके आणि जिल्हानिहाय नियोजन
वारीच्या गर्दीचे नियोजन लक्षात घेता पंढरपूरमध्ये चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत — चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना.

चंद्रभागा बसस्थानक : मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा व पंढरपूर आगार

भिमा : छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती

विठ्ठल कारखाना : नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

पांडुरंग बसस्थानक : सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

प्रत्येक बस स्थानकावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, चौकशी कक्ष, संगणकीय आरक्षण केंद्र व मार्गदर्शक फलक यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.

चालक-वाहकांसाठी सुविधांची घोषणा
चालक व वाहकांसाठी निवास, जेवण व गरम पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच बसेसची देखभाल-दुरुस्ती वेळेवर व्हावी यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन
वारीदरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ३६ पेक्षा अधिक वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत.

गतवर्षी ५,००० विशेष बसेसद्वारे २१ लाख भाविक प्रवाशांनी पंढरपूर यात्रा केली होती. यंदा ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याने नियोजन अधिक व्यापक आणि कडक करण्यात आले आहे.

  • Related Posts

    एसटीचे खासगीकरण होणार नाही – परिवहन मंत्री सरनाईक यांची ग्वाही

    Spread the love

    Spread the loveराज्य शासनाचा अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली एसटी महामंडळ ही सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची ‘मातृसंस्था’ असून तिचे खासगीकरण होणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप…

    लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा! महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक , आमदार कैलास पाटील यांची माहिती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ता. 14: कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *