
भिगवण -: महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट देत पाहणी केली. या दरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या अन्नपदार्थांची गुणवत्ता, दर, तसेच नाश्ता योजनेबाबत माहिती घेतली.
पाहणीदरम्यान महिला प्रवाशांनी प्रसाधनगृहांच्या अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदवल्यानंतर, सरनाईक यांनी तात्काळ संबंधित हॉटेल मालकाला सुधारणा करण्याचे आदेश दिले. अन्यथा अशा थांब्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, या थांब्यांचे नियंत्रण पुणे विभागात असल्याने विभाग नियंत्रकांना देखील एका महिन्याच्या आत त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, भिगवणजवळील एका अनधिकृत हॉटेल थांब्यावर एसटीच्या अनेक बसेस थांबलेल्या असल्याचे सरनाईक यांच्या निदर्शनास आले. तेथे अस्वच्छ परिस्थितीत प्रवाशांना अन्न पुरवले जात असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, संबंधित चालक-वाहकांवर कारवाईचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
याच दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी भिगवण बसस्थानकालाही भेट दिली. स्थानिक नागरिकांनी बसस्थानकाची अत्यंत खराब स्थिती, पावसाळ्यात होणारी पाण्याची अडचण आणि अस्वच्छ प्रसाधनगृहांची कैफियत मंत्री सरनाईक यांच्याकडे मांडली. त्यानंतर महामंडळाच्या बांधकाम विभागाशी संवाद साधत, नवीन भिगवण बसस्थानकाच्या कामासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले.
ही कारवाई केवळ अचानक भेटीपुरती मर्यादित न राहता, प्रवाशांच्या सुविधांसाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे यावरून स्पष्ट होते.