
धाराशिव – जिल्ह्यात आगामी सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध आंदोलने यांचा विचार करता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी लागू केली आहे. हा आदेश २९ मे २०२५ रोजी मध्यरात्री ००:०१ वाजेपासून ते ११ जून २०२५ रोजी २४:०० वाजेपर्यंत प्रभावी राहील.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे. या काळात महाराणा प्रताप जयंती (२९ मे), राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती (३१ मे), शिवराज्याभिषेक सोहळा (६ व ७ जून), तसेच बकरी ईद (९ जून) हे सण व उत्सव पार पडणार आहेत. यामुळे शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, वक्फ कायद्याचा विरोध, शेतकरी आंदोलने, पिकविमा व नुकसानभरपाईबाबतच्या मागण्यांमुळे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी आदेश जारी करत पुढील गोष्टींवर बंदी घातली आहे – शस्त्र, सोटे, तलवार, बंदूक, लाठ्या, दगड किंवा इजा करणाऱ्या वस्तू जवळ बाळगणे, स्फोटके, दाहक पदार्थ वा फेकण्याजोगी साधने ठेवणे, आवेशी भाषणे, विडंबनात्मक कृती, संविधानविरोधी घोषणा, चित्रफलक, अशोभनीय वर्तन किंवा सामाजिक सलोखा बिघडवणारी कृती करणे, तसेच पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींचा जमाव, मोर्चा, मिरवणूक काढणे यास प्रतिबंध राहील.
जिल्ह्यातील सण, यात्रा, जत्रा व उरूस शांततेत पार पडावेत व संभाव्य आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.