
तुळजापूर – बारुळ येथील शेतकरी सचिन ठोंबरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या शेतात घुसून अंबादास पाचरूडकर आणि देविदास पवार यांनी त्यांना लोखंडी रॉड आणि कत्तीने मारहाण केली. या हल्ल्यात ठोंबरे गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी ठोंबरे यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. ठोंबरे यांनी पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, बीट अंमलदार पांडुरंग फुलसुंदर आणि ज्ञानेश्वर पोपलायत यांच्यावर हल्लेखोरांशी संगनमत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या तिघांची तात्काळ बदली करून त्यांच्यावर चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ठोंबरे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आईने जेएसडब्ल्यू कंपनीला पवनचक्कीसाठी २० गुंठे जमीन भाडेतत्वावर दिली होती. मात्र, कंपनीने ३० ते ३५ गुंठे जमिनीवर अतिक्रमण केले आहे. याबाबत त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली असता, त्यांना धमक्या देण्यात आल्या. तसेच, हल्लेखोरांनी स्वतःला पोलीस खात्यातील निवृत्त अधिकारी असल्याचे सांगत तुळजापूर पोलीस स्टेशन आपल्या ताब्यात असल्याचे म्हटले आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.