
बार्शी – बार्शी येथील आदर्श लॉन्स मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान बार्शी विधानसभा भाजप नेते आणि माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी भूषवले. कार्यक्रमास २,००० हून अधिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सदस्य नोंदणी अभियानाला मोठा प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितांमध्ये सदस्य नोंदणी अभियान प्रभारी ऍड. अनिल काळे यांचा समावेश होता, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी केशव बापू यांनी सांभाळली. यावेळी ऍड. अनिल काळे यांनी भाजपा सदस्य नोंदणीचे १ लाख उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी देशाचे कणखर नेतृत्व करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश यशस्वीपणे प्रगती करत असल्याचा उल्लेख केला. त्यांनी भाजपचा सदस्य होण्याचे महत्त्व स्पष्ट करत, “भाजपच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी आणि देशाच्या विकासाचा भाग होण्यासाठी सर्वांनी सदस्यत्व नोंदवावे,” असे आवाहन केले.
ऍड. काळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रेरणा देताना सांगितले की, “पराभवाने खचून जाऊ नका. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, ही विकासासाठी काम करण्याची योग्य वेळ आहे.” त्यांनी राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, “राजाभाऊ हे जनतेच्या मनातील आमदार आहेत. सतत जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी झगडणाऱ्या राजाभाऊंना पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही,” असे ठामपणे सांगितले. त्यांनी राजाभाऊ हे देवेंद्र फडणवीस यांचे लाडके कार्यकर्ते असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह संपूर्ण भाजप नेतृत्व बार्शी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ आहे. विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे. एकजुटीने काम करून आपण १ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट सहज गाठू शकतो.”
या मेळाव्यामुळे बार्शीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सर्व कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी अभियानाला संपूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली.