तुळजापूर: राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज तुळजापुरात पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली.
“जनतेने जनाधार दिला आहे घरी बसण्यासाठी. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आता घरी बसले पाहिजे,” असे वक्तव्य करत विखे पाटील यांनी सुळे यांना थेट लक्ष्य केले.
यावेळी त्यांनी सुळे यांच्या मागील कार्यकाळाचा उल्लेख करत म्हटले की, “त्यांनी वांग्याचे चांगले उत्पन्न घेतले होते, पण आता त्या वांगे-बटाट्याचे गणित त्यांनी राज्याला सांगावे.”
सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेवरूनही विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “सुळे यांनी फडणवीस यांच्यावर बोलण्याऐवजी स्वतःच्या कामाचा विचार करावा,” असे टोमणे त्यांनी लगावले.
विखे पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे सुळे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण असून पुढील राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.