
स्पष्ट, कायदेशीर स्पीकिंग ऑर्डर देत बडतर्फ करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई – : गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळात झालेल्या अनियमिततेची माहिती समोर आली असून ती धक्कादायक आहे. नियमबाह्य खरेदी प्रकरणांत दोषी असलेल्या अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फ करण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य ॲड अनिल परब यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दापोडी येथील मध्यवर्ती भांडार खरेदीत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.
परिवहन मंत्री श्री.सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळातील गंभीर गैरव्यवहारांप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर अनेक गंभीर आरोप असल्याने त्यांना निलंबित करण्यात येईल. तथापि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्याला केवळ निलंबित करून करून भागणार नाही, तर स्पष्ट कायदेशीर नोटीस देत त्याचे म्हणणे ऐकून घेऊन नंतर स्पीकिंग आर्डर देऊन बडतर्फ केले जावे. त्यावर परिवहन मंत्री यांनी स्पीकिंग ऑर्डरचे निर्देश देऊन त्या अधिकाऱ्याला बडतर्फ केले जाईल, असे सांगितले.