
धाराशिव – धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस विभागाच्या विविध कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रण, पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता, सण-उत्सवांदरम्यानची सुरक्षाव्यवस्था व नागरिकांशी सुसंवाद यासारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. पोलीस दलाच्या अंमलबजावणीमधील पारदर्शकता, प्रामाणिकपणा व कार्यक्षमतेचा त्यांनी उल्लेख करून समाधान व्यक्त केले.
या दौऱ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी उभारण्यात आलेल्या निवासी सदनिकांचे वितरन मिश्र यांच्या हस्ते या नव्याने उभारण्यात आलेल्या निवासी इमारतीतील सदनिकांचे पात्र पोलीस कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. पोलीस दलाच्या सामाजिक व कौटुंबिक स्थैर्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
तसेच, आढावा बैठकीदरम्यान उत्कृष्ट कामर्यगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि त्यांच्या टीममधील इतर अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या प्रभावी तपास कार्यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे परंडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस अंमलदार राहुल खताळ यांनी CIER (Central Equipment Identity Register) पोर्टलचा प्रभावी वापर करून हरवलेले मोबाईल फोन शोधून काढले. हे मोबाईल फोन मूळ मालकांना त्यांच्या हस्ते परत करण्यात आले. या उपक्रमामुळे पोलीस विभाग आणि नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन व खबरदारीबाबत मिश्र यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कायदा-सुव्यवस्थेच्या राखणीत कोणतीही तडजोड न करता दक्ष राहण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शाफाकत आमना, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.