
तुळजापूर : राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज सकाळी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात मंत्री शेलार यांच्या अध्यक्षतेखाली श्री तुळजाभवानी मंदिराच्या नवीन विकास कामासंदर्भात पुरातत्व विभागासोबत आढावा बैठक घेण्यात आली. यापूर्वीही, गेल्या महिन्यात मंत्रालयात त्यांच्या दालनात पुरातत्व विभागासोबत यासंदर्भात चर्चा झाली होती.
या भेटीदरम्यान ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्र’ संस्थेचे नवनियुक्त उपाध्यक्ष तथा विश्वस्त आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र देऊन श्री. शेलार यांचा सत्कार केला.
या प्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, सहायक संचालक जया वहाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, सहायक व्यवस्थापक (स्थापत्य) राजकुमार भोसले, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, सहायक जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.