धाराशिव दि.8 फेब्रुवारी (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी खालील पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार,पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार,संत रविदास पुरस्कार,शाहू,फुले,आंबेडकर पारितोषिक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि अटी
इच्छुकांनी १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय धाराशिव येथे अर्ज सादर करावा. पुरस्कारांचे स्वरूप : धनादेश, सन्मानपत्र, मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल,स्मृतीचिन्ह,शाल व श्रीफळ यांचा समावेश आहे.पुरस्कारांचे वितरण पुढीलप्रमाणे करण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार – ५१ व्यक्ती व १० संस्था,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार – २५ व्यक्ती व ६ संस्था,पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व संत रविदास पुरस्कार – प्रत्येकी १ व्यक्ती व १ संस्थेला देण्यात येईल.
शाहू,फुले,आंबेडकर पारितोषिक – प्रत्येक महसूल विभागातून २ संस्था, एकूण १२ संस्था,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार –प्रत्येक महसूल विभागातून ३ संस्था (प्रथम,द्वितीय,तृतीय) एकूण १८ संस्था
पात्रता निकष : संस्था ही किमान १० वर्षांपासून समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असावी. संबंधित संस्था किंवा व्यक्तीविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी.पुरस्कारासाठी पात्रतेचा कालावधी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ असा विचारात घेतला जाईल.
पुरस्कारांबाबत अधिक माहितीसाठी आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.