
श्री क्षेत्र तुळजापूर येथे आज हैद्राबाद येथून आलेल्या निस्सीम देवीभक्त पद्मप्रिया सतीश गौड यांनी आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाचा लाभ घेत देवीच्या चरणी साडे आठ तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण केला.
गौड कुटुंबीय हे तुळजाभवानी देवीचे निष्ठावान भक्त असून दरवर्षी खास दर्शनासाठी तुळजापूरला येत असतात. आजच्या या विशेष भेटीत त्यांनी देवीची ओटी भरली व कुलधर्म कुलाचार पार पाडत देवीची विधिवत पूजा केली.
मंदिर संस्थानच्या वतीने गौड कुटुंबीयांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक (धार्मिक) रामेश्वर वाले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, पुजारी विश्वजित पाटील तसेच मंदिर संस्थानचे इतर कर्मचारी उपस्थित होते.