
तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुखसुविधांसाठी तुळजापूर शहरात पार्किंगची सुविधा अत्यावश्यक बनली आहे. याच पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील वनक्षेत्रातील २६ गुंठे जागा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विकास कामासाठी व पार्किंगसाठी ताब्यात घेण्याची मागणी भाविक भक्तांकडून व शहरवासियांकडून होत आहे.
तुळजापूरच्या घाटशील रोडवरील पार्किंगच्या शेजारी वन विभागाचे कार्यालय व २६ गुंठे जागा आहे. सन २०२३ मध्ये शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात तात्कालीन जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबास यांनी ही जागा भाविकांच्या दुचाकी पार्किंगसाठी तात्पुरती ताब्यात घेतली होती. या संदर्भात तुळजापूर नगरपालिकेकडून पत्रही देण्यात आले होते.
शहरातील वाढत्या भाविकांच्या गर्दीचा व विकास कामांचा विचार करून चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर नुतन जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी वन विभागाची ही २६ गुंठे जागा मंदिर संस्थानच्या पार्किंग व विकास कामांसाठी ताब्यात घेण्याची मागणी जोर धरत आहे.
भाविक भक्त व पुजारी बांधवांनीही वन विभागाच्या कार्यालयासाठी तुळजापूर शहराच्या बाहेर जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. या मागणीवर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी व पार्किंगची सोय करण्यासाठी ही जागा ताब्यात घेतल्यास मंदिर परिसरात येणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.