
तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे भाविकांसाठी लाडू प्रसाद सेवा सुरू करण्यात आली असून, या सेवेमुळे देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना भक्तिभावाने परिपूर्ण व सुलभ प्रसाद सेवा उपलब्ध होणार आहे.
आज सकाळी ७:३० वाजता या सेवेचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे सपत्नीक उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी त्यांनी सपत्नीक पूजा करून प्रसाद सेवेचा शुभारंभ केला.
प्रसाद सेवेच्या शुभारंभानंतर चितळे परिवाराकडून भाविकांना एक हजार लाडूचे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश भाविकांना दर्जेदार, स्वच्छ व श्रद्धाभाव निर्माण करणारी प्रसाद सेवा पुरवणे हा असून, यामुळे मंदिरातील सेवाभाव अधिक सशक्त होणार आहे.
मंदिर परिसरात लाडू प्रसादाचे तीन काउंटर
लाडू प्रसादाच्या विक्रीसाठी मंदिर परिसरात तीन वेगवेगळे काउंटर सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येक लाडू पाकिटाचे वजन ५० ग्रॅम असून, त्याची किंमत ३० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
उद्घाटन समारंभास प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अहिरराव, संस्थानचे विश्वस्त तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, सर्व महंत, तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष, तसेच लाडू प्रसाद पुरवठादार चितळे कंपनीचे अधिकारी, मंदिर संस्थानचे कर्मचारी, पत्रकार व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.