
धाराशिव – पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त होणाऱ्या आठ अधिकारी व अंमलदारांचा आज पोलीस अधीक्षक कार्यालयात एका भावपूर्ण कार्यक्रमात निरोप समारंभ संपन्न झाला. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या हस्ते या सर्वांना सन्मानित करण्यात आले. सेवेतील आठवणींना उजाळा देताना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले.
पोलीस अधीक्षक कार्यालयात दर महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांसाठी निरोप समारंभाचे आयोजन केले जाते. या परंपरेनुसार, आज दिनांक ३१ मे २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ, महिला श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुक्मिणी पिराजी मंजुळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. बालाजी गोरखनाथ गिरी, पोलीस सहाय्यक फौजदार श्रीमंत नरसु मिसाळ, शंकर भानुदास मोरे, दिलीप सिमाराम धावडे, पोलीस हवालदार गुलचंद फुलचंद गंगावणे आणि प्रमुख लिपिक परमेश्वर उत्तरेश्वरअप्पा गंभीरे या आठ जणांना निरोप देण्यात आला.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आजवरच्या सेवेचे कौतुक करून त्यांच्या भावी निरोगी व सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसमवेत उपस्थित होते. नोकरीतील अनुभव कथन करताना अनेकजण भावूक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले, ज्यामुळे वातावरण गंभीर झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनघा गोडगे यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, श्रीगणेश कानगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर, हिंगोले, भिंगारे, कासुळे यांच्यासह इतर अनेक अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.