
परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
धाराशिव – जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात देशातील २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत , आपल्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच २५ एप्रिल रोजी होणारे सर्व कार्यक्रम (रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर वगळता) रद्द करण्यात यावेत , असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले की, ” हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना अतिशय कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. यादृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शहा स्वतः लक्ष घालत असून त्यांना त्यात यश मिळेल. या घटनेत पर्यटकांना मारताना ते मुसलमान नाहीत, याची खात्री करून मारण्यात आले आहे. ही अतिशय संतापजनक बाब असून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो “.
ते पुढे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्व कार्यकर्त्यांनी श्रीनगर येथे अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरूप घरी आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या दुःखा मध्ये आपण सर्व सामील असून या कुटुंबावर ओढावलेल्या दुःखद प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी त्यांना धैर्य द्यावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.