
तुळजापूर – : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात देवीला महाअलंकार आणि महावस्त्र परिधान करून नैसर्गिक रंगांची उधळण करण्यात आली.
तुळजाभवानीच्या अभिषेकानंतर विधीवत महाआरती करण्यात आली. त्यानंतर मंदिराचे मुख्य पुजारी, महंत, सेवेकरी आणि मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देवीला नैसर्गिक रंग लावले. गाभाऱ्यातच “आई राजा उदो उदो” अशा जयघोषात रंगांची उधळण झाली. रंगांच्या छटांमुळे देवीचे रूप अधिक तेजस्वी आणि भव्य भासत होते.
रंगपंचमीच्या या विशेष सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. मंदिरात रंगोत्सवाचा आनंद भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.