पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रदेशाध्यक्ष पदी डॉ. किशोर पाटील यांची निवड. राज्यातील पत्रकारांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार-डॉ. किशोर पाटील
मुंबई – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. किशोर पाटील यांनी पहिले भिवंडी महानगर क्षेत्र अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते, त्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कोकण विभागीय महासचिव म्हणून जबाबदारी दिली होती तेथे ते यशस्वी झाले म्हणून त्यांना संघटनेने आता पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. राज्यभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही कार्यकारिणी नवे धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.
या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे होते. कार्यक्रमाच्या प्रमुख व्यासपीठावर ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष निलेश सोमाणी, सोशल मीडिया अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी मानले. पत्रकारांच्या संरक्षण आणि हक्कांसाठी संघटना नेहमीच पाठीशी उभी राहील.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची मजबूत कार्यप्रणाली तयार करून पत्रकारांवरील हल्ल्यांना वाचा फोडण्यासाठी, महिला पत्रकारांना विशेष सुरक्षा आणि मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणार, तसेच
राज्यातील विविध जिल्ह्यांतील पत्रकारांसाठी कायदेशीर मदत आणि तक्रार निवारण प्रणाली उभारण्याचा मानस आहे, त्याचप्रमाणे राज्यातील पत्रकारांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असे यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष डॉ. किशोर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
संघटनेच्या नेतृत्वाने स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील पत्रकारांच्या विकासासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी डॉ. किशोर पाटील हे लढा देतील.