छबीना विधीनंतर तुळजाभवानी मंदिर परिसरात किरकोळ हाणामारी; १० जणांवर गुन्हा, दोन वर्षे प्रवेशबंदी

Spread the love

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिरात चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त २ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या देवीच्या छबीना विधीनंतर मंदिर परिसरात दोन गटांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद होऊन किरकोळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंदिर संस्थानच्या सुरक्षा निरीक्षकांच्या फिर्यादीवरून १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांना दोन वर्षांसाठी मंदिर प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.

मंदिर संस्थानाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, छबीना विधी संपल्यानंतर रात्री सुमारे ११.०५ वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरातील गोंधळ कट्टा व समोरील भागात काही व्यक्तींमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर किरकोळ हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटातील व्यक्तींनी एकमेकांवर नारळ, काठ्या, फळे तसेच उपलब्ध साहित्य फेकून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच मंदिर प्रशासन, पोलीस, सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक पुजारी यांनी तातडीने हस्तक्षेप करत अवघ्या १५ मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित व्यक्तींना मंदिर परिसराच्या बाहेर काढण्यात आले आणि परिसरातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यात आली.

मंदिर संस्थानाने स्पष्ट केले आहे की, हा प्रकार संबंधित व्यक्तींच्या वैयक्तिक वादातून घडलेला असून त्याचा मंदिर व्यवस्थापन, धार्मिक विधी किंवा मंदिरातील शिस्त यांच्याशी कोणताही संबंध नाही.

दरम्यान, या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर चुकीच्या आणि भ्रामक माहितींसह प्रसारित होत असल्याचे संस्थानच्या निदर्शनास आले आहे. यामुळे भाविकांमध्ये गैरसमज आणि अनावश्यक भीती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओ हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून संबंधितांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ३ एप्रिल २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम १२५, १९४(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मंदिर संस्थानाने भाविकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सोशल मीडियावर कोणतीही भ्रामक माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मंदिर परिसरातील शांतता, सुव्यवस्था आणि शिस्त राखण्यासाठी सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *