तुळजापूरच्या नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन
तुळजापूर – : अत्यंत देखण्या अशा राज्यातील तालुकास्तरावरील न्यायालयाच्या इमारतीचे तुळजापूर येथे उद्घाटन होत आहे,ही आनंदाची बाब आहे. नुकतेच आपण संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले.संविधानाच्या तत्वाचे पालन या इमारतीतून करताना न्यायापासून वंचित असलेल्यांना न्याय देण्याचे काम करावे.असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.प्रसन्न वराळे यांनी केले.
२० डिसेंबर रोजी तुळजापूर येथे नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन न्या.श्री.वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री.वराळे बोलत होते.अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री.चंद्रशेखर होते.यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या.रवींद्र घुगे,न्या.श्रीमती. विभा कंकणवाडी,पालक न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे,न्या.किशोर संत,न्या.अरुण पेडणेकर, न्या.वाय.जी.खोब्रागडे,न्या.आर.एम.जोशी,
न्या.मेहरोज अशरफ खान पठाण, न्या.वैशाली जाधव पाटील,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती.अभिश्री देव यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
न्या.श्री.वराळे म्हणाले की,समता,न्याय व बंधुता या तत्वावर भारताचे संविधान काम करते.जातीप्रथेमुळे भेदाभेद निर्माण होतो. भेदाच्या ह्या भिंती गळाल्या पाहिजे. त्यासाठी बंधुता आली पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिला आहे,तो अत्यंत महत्वाचा आहे. आपण भाग्यवान आहोत की, आपल्याला संतांच्या शिकवणीचा लाभ मिळाला.मात्र त्यांची शिकवण आपण लक्षात घेत नाही.समतेचा संदेश आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने दिला जातो.हेच आपल्या संविधानाचे मूलतत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आराध्य दैवत आहे.जाणता राजा म्हणून त्यांची ओळख आहे.ते उत्तम प्रशासक होते.जगाच्या पाठीवर ग्रेट राजे हे शिवाजी महाराज होते.त्यांना रयतेची काळजी होती.असे त्यांनी सांगितले.
न्याय हा समबुद्धीने दिला पाहिजे असे सांगून न्या.श्री.वराळे म्हणाले की,अन्याय काय झाला आहे हे बघितले पाहिजे. समतोल तत्वाचे पालन करून न्याय दिला पाहिजे.न्याय व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी जो न्यायापासुन वंचित आहे, त्यांना न्याय देण्याचे काम करावे.न्याय देताना तो कमी वेळात व कमी खर्चात मिळवून दिला पाहिजे. उत्तम विधीज्ञ न्यायासाठी मदत घेतली पाहिजे. संविधानाच्या तत्वाचे प्रत्येकाने पालन करताना संविधानाच्या तत्वानुसार न्याय दिला पाहिजे.असे न्या.श्री.वराळे यावेळी म्हणाले.
न्या.श्री.चंद्रशेखर म्हणाले की,तुळजापूर न्यायालयाच्या नूतन इमारतीचे आनंदाचा क्षण आहे.अत्यंत देखणी अशी ही वास्तू तयार झाली आहे.तुळजापूर हे ऐतिहासिक ठिकाण आहे.न्यायिक अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मेहनतीतून ही वास्तू साकारली आहे.तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे अधिष्ठान आहे.या वास्तूमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना,पक्षकारांना व विधिज्ञ मंडळाच्या सदस्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.आधुनिक व मूलभूत सुविधा इथे आहेत.त्यामुळे नागरिकांना व पक्षकारांना येथून चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजे.ही नूतन इमारत सर्वांसाठी उपयुक्त ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
न्या.श्री.ब्रम्हे म्हणाले की,मराठवाड्याच्या अडीअडचणीची जाण असलेल्या व इथल्या मातीशी नाळ जुळलेल्या मान्यवरांच्या मार्गदर्शनातून ही देखणी व सर्व सुविधायुक्त अशी वास्तू उभी राहिली आहे.या इमारतीचे पावित्र्य टिकविणे हे इथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे,पक्षकारांचे,नागरिकांचे व अधिकाऱ्यांचे काम आहे.भारतीय संविधानातील उद्देशिकेतील मूल्यांची जोपासना या इमारतीतून झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्वागतपर भाषणातून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती.अभिश्री देव यांनी न्यायालयाच्या नूतन इमारतीत उपलब्ध सोयीसुविधांची माहिती दिली.
प्रारंभी न्यायमूर्ती श्री.प्रसन्न वराळे यांनी कोनशिला व फित कापून नूतन इमारतीचे उद्घाटन केले.यावेळी मान्यवरांनी इमारतीतील विविध दालनाची पाहणी केली व विधिज्ञ मंडळाच्या दालनाचे उद्घाटन केले.
मान्यवरांच्या हस्ते मंचावरील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करण्यात आले.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एन.व्हि.भंडे,कार्यकारी अभियंता एस.जी.केत,सी.व्ही.चाकोते,उपविभागीय अभियंता व्हि.वाय.आवळे,सहायक अभियंता डी.डी.जंजाळ,कनिष्ठ अभियंता ओ.के.कुलकर्णी,न्यायालयीन इमारतीचे बांधकाम कंत्राटदार डी.एस.हरकुळे व विद्युत कंत्राटदार संतोष कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार राणाजगजितसिंह पाटील,महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य वसंतराव साळुंके,मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक स्वप्निल खटी, मुंबई उच्च न्यायालयाने निवृत्त न्या.के.एल.वड्डे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिवच्या सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी,सर्व विधीज्ञ मंडळाचे पदाधिकारी,जिल्हयातील विविध न्यायालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच सोलापूर व लातूर जिल्ह्यातील विधिज्ञ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. तुळजापूर विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.दत्तात्रय घोडके यांनी प्रस्ताविक केले. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.