धाराशिव -: राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेत क्रीडाविषयक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने शासनामार्फत दरवर्षीप्रमाणे जिल्हास्तरावर क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.त्यानुसार दिनांक १२ ते १८ डिसेंबर,२०२५ या कालावधीत क्रीडा सप्ताह साजरा करण्यात येत असून,या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ १२ डिसेंबर, २०२५ रोजी श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव येथे संपन्न झाला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास डॉ. चंद्रजीत जाधव (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी, सरचिटणीस – महाराष्ट्र राज्य खो-खो संघटना व उपाध्यक्ष – महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना) तसेच श्री.अदित्यभैय्या पाटील (कार्यकारी अधिकारी, श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी श्री.प्रमोद कदम (उपमुख्याध्यापक,श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव), श्री.प्रविण बागल (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी),श्री.श्रीकांत हरनाळे (जिल्हा क्रीडा अधिकारी,धाराशिव) व श्री.भैरवनाथ नाईकवाडी (तालुका क्रीडा अधिकारी) यांची उपस्थिती लाभली.
सर्व मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. हरनाळे यांनी केले.
श्री.अदित्यभैय्या पाटील (कार्यकारी अधिकारी) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक जीवनासोबतच क्रीडेत सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. चंद्रजीत जाधव यांनी विद्यार्थ्यांना खेळाच्या सरावात सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला तसेच क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहण्याचे आवाहन केले.अधिकाधिक विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये सहभाग घ्यावा,असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमासाठी सुमारे ४५० विद्यार्थी व खेळाडू उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शुभांगी रोकडे (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्री.भैरवनाथ नाईकवाडी (तालुका क्रीडा अधिकारी) यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती निकिता पवार (क्रीडा कार्यकारी अधिकारी),श्री.अक्षय विरादार (क्रीडा अधिकारी),श्रीमती जान्हवी पेठे,श्री.सुरेश कळमकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.