धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये तब्बल १ लाख ४३ हजार ९६९ खातेदारांच्या ३१ कोटी रुपयांच्या ठेवी दावा न केल्यामुळे पडून आहेत. या हक्काच्या ठेवी मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेच्या पुढाकाराने एक विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. चिन्मय दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय स्टेट बँक (जिल्हा अग्रणी बँक) आणि जिल्ह्यातील इतर सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने ही मोहीम १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत वैयक्तिक, संस्थात्मक आणि विविध सरकारी योजनांशी संबंधित खात्यांमधील दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्याची सुवर्णसंधी खातेदारांना मिळणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, जे बँक खाते सलग १० वर्षे निष्क्रिय असते, त्यामधील रक्कम ‘ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी’ (DEAF) मध्ये जमा केली जाते. मात्र, असे असले तरी खातेदारांचा आपल्या पैशांवरील कायदेशीर हक्क कायम राहतो आणि ते कधीही ही रक्कम परत मिळवू शकतात.
आपल्या हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. तिथे आवश्यक कागदपत्रे आणि अद्ययावत केवायसी (KYC) जमा केल्यानंतर त्यांना त्यांची रक्कम परत मिळेल. या मोहिमेदरम्यान सर्व बँका जनजागृती शिबिरे आणि ग्राहक भेटींसारखे कार्यक्रम आयोजित करणार असून, जिल्ह्यातील सर्व पात्र खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. दास यांनी केले आहे.

