जिल्ह्याची परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी सेवाभावी संस्थांचे योगदान अत्यावश्यक ,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Spread the love

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाभावी संस्थांची समन्वय बैठक

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात २१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन शेती,सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शेतकऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसला असून आर्थिक हानी देखील प्रचंड झाली आहे.या आपत्तीमधून जिल्ह्याला सावरण्यासाठी व प्रगतीकडे नेण्यासाठी सेवाभावी संस्थांचे योगदान फार महत्त्वाचे आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात ३ ऑक्टोबर रोजी आयोजित पूरग्रस्त मदत समन्वय बैठकीत श्री.पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड,टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे कार्यक्रम समन्वयक गणेश चादरे,पर्याय संस्थेचे विश्वनाथ तोडकर,एस.एस.पी.संस्थेच्या सौ.नसीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की, नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत.शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी मानसिक समुपदेशन आणि मदतीची गरज आहे. हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देणे,रब्बी हंगामासाठी मदत करणे तसेच रोजगार हमी योजनेद्वारे शेतरस्ते व बांध दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील.भूमिहीन शेतमजुरांना रोहयोतून कामे उपलब्ध करून दिले जाईल,असे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते, पूल आणि इमारतींना २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्री.पुजार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील १४० गावे पूरग्रस्त झाली आहेत.या गावांना एनजीओनी दत्तक घेऊन आरोग्य,शिक्षण,कृषी व अन्य क्षेत्रात काम करावे.कृषी उत्पादन वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या,दुग्धव्यवसायात वाढ व्हावी,जलसंधारण व मृदा संवर्धनावर लक्ष केंद्रित करावे,असेही त्यांनी सांगितले.

डॉ.घोष यांनी शाळा व अंगणवाड्यांच्या नुकसानीची माहिती देत स्वच्छता,औषधसाठा,प्राणी चाऱ्याची उपलब्धता आणि स्वच्छ पाणी यावर भर देण्याची गरज व्यक्त केली.

अपर जिल्हाधिकारी सौ.पाटील यांनी पीक नुकसानीचे पंचनामे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाल्याचे सांगून एनजीओंच्या योगदानाचे कौतुक करून आणखी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे गणेश चादरे यांनी पूरस्थितीत एनजीओंनी केलेल्या अन्नधान्य,निवारा,औषधे, मानसिक आधार आणि स्थानिक समुदायाशी केलेल्या समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.एनजीओ व स्वयंसेवकांचे हे कार्य प्रशासनासाठी मार्गदर्शक ठरेल,असे ते म्हणाले.

७० हून अधिक एनजीओंची उपस्थिती

या बैठकीत ७० पेक्षा जास्त सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.त्यांनी आपल्या कामाचा आढावा देत भविष्यातील मदत कार्यासाठी ठोस उपाय सुचविले. निवारा,अन्नधान्य,औषधोपचार, शैक्षणिक मदत,शेतकरी सहाय्य, पर्यावरण संवर्धन,मानसिक आरोग्य व समुपदेशन,तसेच शाश्वत विकासाच्या आराखड्यांवर विस्तृत चर्चा झाली.या कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्रा.बाळ राक्षसे (टाटा सामाजिक विज्ञान संस्था,तुळजापूर) यांनी केले. उपस्थितांचे आभार आनंद भालेराव यांनी मानले.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *