आरोग्य शिबिरातून 12 हजार नागरिकांना दिलासा
छत्रपती संभाजीनगर -: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः मराठवाडा विभागात जानेवारी ते जून 2025 या अवघ्या सहा महिन्यांत तब्बल 3 हजार 39 रुग्णांना 25 कोटी 58 लाख 31 हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून नागरिकांचा विचार करून जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले. त्यातून लाभार्थी नागरिकांची संख्या वाढली. त्यासोबतच आरोग्य शिबिर व रक्तसंकलन आदी उपक्रम प्रभावीपणे राबविणे सहज शक्य होत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुखरामेश्वर नाईक यांनी सांगितले.
जिल्हानिहाय मदत :-
मागील सहा महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 633 रुग्णांना 5 कोटी 33 लाख 38 हजारांची मदत करण्यात आली. बीड -610 रुग्णांना 4 कोटी 89 लाख 6 हजार, परभणी 533 रूग्णांना 4 कोटी 67 लाख 82 हजार, लातूर- 385 रूग्णांना 3 कोटी 29 लाख 55 हजार, जालना-367 रूग्णांना 3 कोटी 11 लाख 45 हजार, नांदेड- 323 रूग्णांना 2 कोटी 80 लाख 20 हजार, धाराशिव-257 रूग्णांना 2 कोटी 21 लाख आणि हिंगोली- 132 रूग्णांना 1 कोटी 16 लाख रूपये प्रमाणे वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.
आरोग्य शिबिरे आणि रक्तदान
1 मे ते 25 जुलै दरम्यान जिल्हा कक्षाच्या मदतीने घेण्यात आलेल्या आरोग्य व रक्तदान शिबिरांमध्ये 12,409 नागरिकांची आरोग्य तपासणी तर 2,353 नागरिकांनी रक्तदान केले.
जिल्हा लाभार्थी नागरिक रक्तदाते
छत्रपती संभाजीनगर 3,058 161
बीड 1,100 75
परभणी 763 467
लातूर 2,522 852
जालना 373 64
नांदेड 226 639
धाराशिव 742 38
हिंगोली 3,625 57
20 गंभीर आजारांकरिता मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून 20 गंभीर आजारांवर मदत केली जाते: त्यात, कॉक्लियर इम्प्लांट, हृदयविकार, किडनी/लिव्हर/बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, नवजात बालकांचे आजार, मेंदू विकार, डायालिसिस, भाजलेले रुग्ण, विद्युत अपघात आदींचा समावेश आहे.
जिल्हा कक्षाच्या माध्यमातून मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही.
रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो.
आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (१.६० लाखांपेक्षा कमी)
- वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र
- रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असावी
- अपघात असल्यास एफआयआर किंवा एमएलसी
- अवयव प्रत्यारोपण असल्यास झेडटीसीसी नोंदणी पावती
सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या ईमेल वर पाठवावीत. अधिक माहिती करिता टोल फ्री क्र. १८०० १२३ २२११ या क्रमांकावर कॉल करावा.