
धाराशिव – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अंतर्गत नवीन उद्योजक उभा करण्यासाठी देण्यात येणारे कर्ज लाभार्थ्यांना दिले जात नाही. यामध्ये बँका अग्रेसर असून यापुढे एकाही राष्ट्रीयकृत बँकेने कर्ज देण्यास टाळाटाळ न करता त्यांना दिलेली कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दि.२३ मे रोजी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील, स्व अण्णासाहेब पाटील विकास फौंडेशनचे अध्यक्ष खंडू राऊत, संकेत सुर्यवंशी, गणेश साळुंके, मुकुंद घाडगे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, मराठा समाजातील उद्योग व व्यवसाय करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ बँकेला १२ टक्के व्याज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून एक लाख उद्योजक करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यापेक्षा जास्त उद्योजक तयार झाले असून त्यांना या महामंडळाच्या सहाय्याने बँकेद्वारा कर्ज पुरवठा करण्यात आला असल्याची त्यांनी सांगितले. कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड करण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे अनेकांना त्याचा फायदा होत असल्याचे सांगत ते म्हणाले की सहकार व खाजगी क्षेत्रातील बँका राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा अधिक पटीने कर्ज पुरवठा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या जिल्ह्यात २८ शाखा असून ही सर्वसामान्य कर्जच देत नसल्याचे त्यांनी सांगत यापुढे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी दिले. याउलट खाजगी व सहकारी बँका उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यास अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीयकृत बँकांनी ४००५ कर्ज प्रकरणांपैकी फक्त ३९६ जणांना कर्ज दिले. तर खाजगी व सहकारी बँकांनी २४६५ जणांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट असताना त्या बँकांनी ५६६४ जणांना कर्ज पुरवठा केला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज वितरणाचे प्रमाण वाढावे यासाठी पुढील महिन्यात ऑनलाइन बैठक घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.