
धाराशिव – खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून, अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’चं अधिकृत नामकरण ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’ असं करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय रेल्वे विभागाने यास अधिकृत मान्यता दिली आहे.
ही केवळ नावाची अदलाबदल नाही, तर धाराशिवच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा दैदिप्यमान विजय आहे, अशा शब्दांत ओमराजेंनी या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे.
धाराशिवचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व अधोरेखित करत गेल्या काही वर्षांपासून ‘धाराशिव’ हे नाव बहाल करण्याची मागणी होत होती. विशेषतः ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने यासाठी आवाज उठवला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून, स्थानिक जनतेतही या निर्णयाचं जोरदार स्वागत होत आहे.
रेल्वे स्थानकावर लवकरच नव्या नावाचे फलक झळकणार असून, विविध प्रशासकीय स्तरावर आवश्यक ती अद्ययावत प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.