विश्वशांती चे प्रतीक राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद हे प्रत्येक तरुण तरुणीचे प्रेरणा स्थान – डॉ. किरण प्रकाश झरकर
स्वामी विवेकानंदांचे गाजलेले महत्वाचे पाच विचार –
उठा जागे व्हा उद्दिष्ट साध्य होई पर्यंत थांबु नका.
स्वतःला कमकुवत समजणे मोठे पाप आहे.
अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक, जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा.
एका वेळी एकच काम करा ते करताना पुर्ण आत्मीयतेने करा.
सत्यासाठी काहीही सोडून द्यावे पण कोणासाठी सत्य सोडू नका.
आपला भारत देश हा जगातला सर्वात मोठा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात आहे. १२ जानेवारी १८६३ रोजी जन्मलेल्या स्वामी विवेकानंदांची आज जयंती आहे. हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून केंद्र व राज्य शासन देशभर साजरा करत आहे. एक सुसंस्कृत, सदाचारी, प्रामाणिक, निष्ठावान, निर्व्यसनी, बलशाली युवक युवती तयार करण्यासाठी स्वामी विवेकानंद हे निश्चितच प्रत्येकाचे आयडॉल असू शकतात. त्यांचे विचार आणि कार्य हे प्रत्येकासाठी प्रेरणा देणारे आहे.
स्वामी विवेकानंद हे विश्व शांतीचे दुत म्हणून ओळखले जातात. भगवे वस्त्र परिधान करून आपल्या तेजस्वी रुपात ओजस्वी वाणीने त्यांनी अनेक देशांना आपल्या विचारांची देणगी दिली. स्थिरता आणि स्थैर्य हवे असेल तर उद्योजकता हवी. उद्योजकता हवी असेल तर कौशल्य हवे. हे त्यांचे सुत्र आजही लागु पडते. ऐन तारुण्यात जर कौशल्य व ज्ञान प्राप्ती झाली तर पुरुष हा महापुरुष होते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजेच स्वामी विवेकानंद होय.
त्या काळी दळण वळणाची साधने कमी असताना सुद्धा स्वामी विवेकानंदांनी विश्वशांतीसाठी अनेक देश पादाक्रांत केले. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची छाप साऱ्या जगावर पाडली. आज दिडशे पेक्षा जास्त वर्षानंतर सुद्धा त्यांच्या विचारांची आल्याला गरज भासते.
उठा जागे व्हा म्हणजे प्रत्येक युवक युवतीने तारुण्यात कौशल्य व ज्ञान प्राप्तीसाठी तयार असले पाहिजे. त्यासाठी कमी वेळेत प्रशिक्षण पुर्ण करुन स्वावलंबी बनले पाहिजे. उद्दिष्ट साध्य होई पर्यंत थांबु नका म्हणजेच चांगली नोकरी किंवा उद्योग करा. त्यासाठी आवश्यक ती औपचारिकता करा. त्यात सातत्य सचोटी प्रामाणिकता ठेवा. तारुण्यात केलेले कष्ट हे आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी सुद्धा फलदायी ठरतात.
स्वतःला कमकुवत समजणे पाप आहे. दर शंभर विद्यार्थ्यानं मागे दहा विद्यार्थी हुशार असतात तीस विद्यार्थी सामान्य असतात तर उर्वरित कमकुवत असतात. ते परिपूर्ण नसतात. मात्र त्यांनी स्वतःला कमकुवत समजणे हे पाप आहे. त्यांनी कमी मेरिटच्या कमी कष्टाच्या कमी हुषारीच्या कौशल्य प्रशिक्षणाकडे वळले पाहिजे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्यांना प्रशिक्षण देण्यास तत्पर आहेत. या साध्या सोप्या सर्वमान्य प्रभावी कौशल्य प्राप्तीने तुमचे जीवन उजळून जाणार आहे. म्हणून ते घेणे आवश्यक आहे.
अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपण शिकत राहिले पाहिजे. मात्र हे शिक्षण कौशल्य व ज्ञान प्राप्त होणारे असावे. त्यातून रोजगारक्षमता व उद्योजकता मिळावी. आपण जे शिक्षण घेतो त्यात रोज नवनवीन बदल होत असतात. आपल्याला या बदलांना आत्मसात करावे लागते. ज्ञान मिळवणे याबरोबरच आपल्या ज्ञानाचे वारंवार नुतनीकरण करणे सुद्धा आवश्यक असते. दररोजच्या जीवनात अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात. हे अनुभवच आपल्याला शिकवत असतात म्हणूनच तर स्वामी विवेकानंद म्हणतात अनुभव हेच आपले सर्वोत्तम शिक्षक आहेत.
प्रत्येक युवक युवतीला सुखकर जीवन जगण्यासाठी नोकरी किंवा उद्योगाची आवश्यकता असते. चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. कष्ट घेत असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर पोलीस भरतीसाठी लाखों उमेदवार प्रयत्न करतात. त्यात काही मोजकेच यशस्वी होतात. काहीजण अनेक वर्ष प्रयत्न करतात त्यात अयशस्वी होनाऱ्यांची यांची संख्या अधिक असते. मग त्यांना नैराश्य येते. ऐन उमेदीचा कालावधी वाया गेल्याने त्यांचे करियर खराब होते. त्यामुळे जिकडे स्पर्धा कमी आहे व नोकरी नाही मिळाली तर उद्योग धंदा करता येईल असे प्रशिक्षण घेणे फायद्याचे ठरते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एका एका कौशल्याचे वेगवेगळे व्यवसाय उपलब्ध आहेत. जसे की रंगरंगोटीच्या कामासाठी पेंटर जनरल, संगणकीय कामासाठी कोपा, वाहनांच्या कामासाठी मोटार मेकॅनिक होय. त्यामुळे असे कौशल्य देणारे प्रशिक्षण घेतल्याने आपले जीवन सुखकर होते.
सत्यासाठी काहीही सोडून द्यावे पण कोणासाठी सत्य सोडू नये हा स्वामी विवेकानंदांचा महत्त्वाचा विचार आहे. अनेक युवक युवती आपण सामान्य आहोत किंवा कमकुवत आहोत हे मान्यच करत नाहीत. हे सत्य स्वीकारतच नाहीत. प्रत्येकाला आयएएस आयपीएस बनायचे आहे. पोलीस व मिलिटरी मध्ये भरती व्हायचे आहे. त्यामुळे तिकडे खूप मोठी स्पर्धा लागलेली आहे. कौशल्य विकासाचे क्षेत्र ओस पडत आहे. त्यात अतिशय कमी स्पर्धा आहे आजही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा एक व्यवसाय झालेला प्रशिक्षणार्थी त्याला अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत त्याचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे. चीन, जपान, रशिया हे देश खूप वेगाने प्रगती करत आहेत कारण तेथे कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धती आहे. त्यामुळे तेथे प्रत्येकाकडे कौशल्य असते. तेथील लोक नोकरीच्या पाठीमागे न धावता स्वतःचा उद्योग करतात व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले जीवन सुखकर बनवतात. आपल्या भारत देशाला जर जगात अव्वल स्थानावर न्यायचे असेल तर कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता यावर आपल्याला भर दिला पाहिजे आणि हे सत्य इथल्या समाज व्यवस्थेला समजले पाहिजे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कालावधीत कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. स्किल इंडिया, स्टार्ट अप इंडिया, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, नमो महारोजगार मेळावा, परीक्षा पे चर्चा, मुद्रा लोन योजना, प्रधानमंत्री कौशल्य दौड यांसारख्या योजनांमुळे युवक व युवतींच्या आत्मविश्वास, कौशल्य व उद्योजकता यात भर पडत आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी व माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांच्या कालावधीत महाराष्ट्र नव्या उमेदीने काम करत आहे. या कालावधीत आलेल्या लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यावेतन योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, संविधान मंदिर, हर घर दुर्गा अभियान, राष्ट्रीय युवा दिन या योजना लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. अनेक तरुण-तरुणी यां योजनांचा लाभ घेत आहेत. यामुळे थोड्या कालावधीत भारत देश जगात अव्वल तर भारत देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर येणार आहे. यासाठी प्रत्येक युवक युवतीने आपले कर्तव्य बजावने आवश्यक आहे. राष्ट्रिय युवा दिनाच्या निमित्ताने त्यासाठीच हा लेख लिखाणाचा प्रपंच आहे.
लेखक
शास्त्रज्ञ डॉ. किरण प्रकाश झरकर
शिल्प निदेशक (कोपा)
भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव
( या लेखाचे लेखक हे जागतिक विश्वविक्रमवीर आहेत. त्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन येथे झालेली आहे. त्यांना स्किल बुक हे पेटंट प्राप्त झालेले आहे. अनेक संस्थांच्या मानद पीएचडी, डिलीट त्यांना मिळालेल्या आहेत)