पशुपालकांनो,शीत लहरींपासून पशुधनाचा असा करा बचाव !

Spread the love

धाराशिव,दि.२६ नोव्हेंबर (जिमाका) जेव्हा एखाद्या भूभाग,स्थान किंवा भौगोलिक क्षेत्राचे किमान तापमान ४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते,त्या वातावरणास शीत लहर म्हटले जाते. हवेच्या प्रवाहांमुळे एखाद्या स्थानावर थंड हवेचा मोठ्या प्रमाणात संचय होऊन शीत लहरी निर्माण होतात. शीत लहरींमुळे पशुधन व वन्यप्राण्यांमध्ये इजा किंवा मृत्यू ओढवू शकतो.

शीत लहरींचा उच्चतम धोका नवजात वासरे,कालवडी,गोहे,रेडक, मेंढ्या-शेळ्यांची कोवळी पिल्ले, आजारी,दुभती,अशक्त तसेच श्वसनविकार असलेल्या पशुधनाला असतो. त्यामुळे या पशुधनाची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

थंड वातावरणात पशुधनाची ऊर्जा गरज वाढते.त्यामुळे उत्तम दर्जाच्या कर्बोदकयुक्त चारा,वैरण,पुरक खाद्य अधिक प्रमाणात द्यावे.शीत लहर तीव्र असल्यास पशुधनास निवाऱ्याबाहेर न सोडता चारा-पाणी आतच उपलब्ध करून द्यावे.बाहेर चरावयास सोडल्यास उपासमार आणि गारठल्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो.

पशुधनाला जंतनाशक औषध व रोगप्रतिबंधक लसीकरण करावे. पुरक पोषणासाठी व्हिटॅमिन ‘A’, खनिज मिश्रणयुक्त आहार द्यावा. थंड वाऱ्यापासून बचावासाठी निवारा चहूबाजूंनी आच्छादित करावा. पत्र्याच्या छतावर वाळलेल्या गवताचा थर ठेवणे आणि जमिनीवर चाऱ्याचा बिछाना टाकणे उपयुक्त ठरते.

कडाक्याच्या थंडीमध्ये कृत्रिम प्रकाश किंवा उष्णतेची सोय करावी, जेणेकरून थंडीच्या ताणाचे (cold stress) परिणाम कमी होतील व दुग्धउत्पादनातील नुकसान टळेल. पिण्यासाठी स्वच्छ, ताजे आणि कोमट पाणी उपलब्ध ठेवावे.
वाहतुकीदरम्यान उबदार वातावरण असलेल्या वाहनांचा वापर करावा. शीत लहरीत पशुधनाची लोकर/केस कमी कापू नयेत.अत्यंत थंडीत आंघोळ घालणे टाळावे.लहान, गाभण आणि दुभत्या जनावरांवर विशेष लक्ष ठेवावे.गोठा हवेशीर, उबदार आणि क्षमतेनुसार कमी गर्दीचा असावा.

चाऱ्याचे व्यवस्थापन : शीत लहरीत हिरवा चारा देणे आरोग्यास लाभदायक ठरते.हिरव्या चाऱ्यातील जीवनसत्वे आणि पाण्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. चारा-खाद्याची भांडी उबदार जागी ठेवावीत.हिरवा चारा ५० टक्के फुलोऱ्यावर कापून वाळवून गवत किंवा मुरघास करून ठेवावा.खाद्यात खनिजद्रव्ये व मिठाचा वापर करावा.

पशुपालकांनी काय करावे

स्थानिक हवामानाचा अद्ययावत अंदाज पाहावा.प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्पर ठेवाव्यात.
निवारा चहूबाजूंनी आच्छादित करावा.छतावर वाळलेले गवत टाकावे.कडाक्याच्या थंडीत कृत्रिम प्रकाश व उष्णता द्यावी.अशक्त व आजारी पशुधनासाठी बारदाण्याची आच्छादने ठेवावीत.उबदार जागेत ठेवून ओलावा टाळावा.शेकोटी पेटविल्यास धुरापासून बचाव करावा.पेंड,गूळ, पौष्टिक आहार द्यावा.गोठ्यात स्वच्छता ठेवून निरगुडी,तुळस, लेमनग्रासच्या जुड्या लटकवाव्यात. रोगप्रतिबंधक लसीकरण नियमित ठेवावे.कोमट पाणी दिवसातून ४ वेळा द्यावे. गर्भधारणेच्या ६ महिन्यानंतर वाढीव खाद्य द्यावे.मृत पशुधनाची विल्हेवाट सुरक्षित अंतरावर करावी.

पशुपालकांनी काय करू नये
शीत लहरीत पशुधन उघड्यावर किंवा मोकाट ठेवू नये.पशु मेळावे टाळावेत. थंड पाणी पाजू नये.निवाऱ्यात ओलावा आणि धूर होऊ देऊ नये.मृत पशुधनाचे शव सार्वजनिक जागेत किंवा रस्त्यांवर टाकू नये.

शेळ्या–मेंढ्यांची विशेष काळजी घ्यावी.स्थलांतरित किंवा रानात बसवणाऱ्या पशुपालकांनी विशेष दक्षता घ्यावी.उबदार आच्छादने वापरावीत.कर्बोदकयुक्त खाद्य द्यावे परंतु ॲसिडॉसिस टाळावा.लोकर कापणी टाळावी. वेळापत्रकानुसार लसीकरण आणि औषधसाठा ठेवावा.

कुक्कुट पक्ष्यांची काळजी
शेडच्या दोन्ही बाजूंना पडदे लावावेत.
तापमान २१–२३°C राखावे.
बल्ब/शेगडी/बुडरचा वापर करावा.
आहारात इलेक्ट्रोलाईट्स व जीवनसत्वे द्यावीत.गादी कोरडी ठेवावी.कोमट पाणी पुरवावे. आवश्यकतेनुसार पोषण तज्ञांचा सल्ला घ्यावा.वरील सर्व उपाययोजना केल्यास शीत लहरींमुळे पशुधनाची हानी प्रभावीपणे टाळता येते.

  • Related Posts

    जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियान संपन्न

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दिनांक १० जून रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय धाराशिव व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था,छत्रपती संभाजीनगर,यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्यचिकित्सक धाराशिव डॉ.धनंजय चाकुरकर,निवासी वैद्यकीय बाह्य…

    दृष्टीदानाचा संकल्पच अंधत्व निर्मूलनाचा प्रभावी मार्ग ; दृष्टी दिन सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नेत्रविभाग,जिल्हा शासकीय रुग्णालय,धाराशिव येथे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० ते १६ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या दृष्टी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *