जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही

Spread the love

जिल्हा नियोजन समिती सभा

धाराशिव –  जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करावे. निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घेऊन जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री. सरनाईक बोलत होते. यावेळी मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले,नगरपालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. अंत्यसंस्कारासाठी ॲनिमल इन्सिडेंटल मशीन नाविन्यपूर्ण योजनेतून खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ग्रामीण व शहरी भागांसाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतून नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही, याची दक्षता नगरपालिका आणि पंचायत विभागाने घ्यावी. आरोग्य विभागाने सर्व सार्वजनिक विहिरींच्या पाण्याची तपासणी प्रयोगशाळेत करावी, हे काम तातडीने सुरू करावे. जिल्ह्याच्या विकासासाठी जेवढा निधी मिळाला आहे, तो पूर्णपणे उपयोगात आणला जाईल. एका आठवड्याच्या आत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची कामे सुरू करावी,असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विरोधात प्रभावीपणे मोहीम राबवावी, असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले.विद्यार्थी आणि युवक वर्गामध्ये व्यापक प्रमाणात अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करण्यात येईल. यासाठी एक महिला पोलिस उपनिरीक्षकाची व पुरुष उपनिरीक्षकांची नियुक्ती करावी. जिल्ह्यातील रस्ते सुरक्षा आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी 9 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नाविन्यपूर्ण योजना केवळ शहरी भागातच न राबविता ग्रामीण भागातही राबविण्यात येईल.जिल्ह्यातील इयत्ता 7 वी ते 10 वीच्या 20 विद्यार्थ्यांना यामध्ये 10 मुले व 10 मुली यांना अंतराळाच्या अभ्यासासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील नासाच्या अंतराळ संशोधन केंद्रात अभ्यासासाठी व भेट देण्यासाठी पाठविण्यात येईल, याचा खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येईल, असेही श्री.सरनाईक म्हणाले.

शहराच्या ठिकाणी पाच जलतरण तलाव बांधण्यात येतील,असे सांगून श्री. सरनाईक म्हणाले,त्यामुळे चांगले जलतरणपटू जिल्ह्यात तयार होतील.विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ते सहभागी होऊन जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील. जिल्ह्यातील युवावर्ग विविध शासकीय सेवेस उच्च पदावर पोहोचला पाहिजे, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांची एमपीएससी व यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल, असे श्री.सरनाईक यांनी सांगितले.

जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेले पाणंद रस्ते विविध कंपनीच्या उत्तरदायित्व निधीतून व अभिसरणातून तयार करण्यात येतील. जवळपास 2000 किमी रस्त्यांसाठी 10 कोटी रुपये निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले,यावर्षी 50 लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी 15 लक्ष वृक्ष लागवड एकाच दिवशी नियोजनातून करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कोल्हापूर-सांगलीचे पुराचे 40 टीएमसी पाणी जिल्ह्यात जवळपास 125 किमीच्या बोगद्यातून आणण्यात येणार आहे. त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यास मान्यता द्यावी. माळुंब्रा येथे कांद्यावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करण्यात येईल,त्यामुळे तेथील शीतगृहात 6 ते 8 महिने कांदा ठेवता येईल व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.सह्याद्री फार्म नाशिकच्या माध्यमातून जिल्ह्यातील उत्पादित होणारे द्राक्ष,केळी,आंबा,माळूंब्रा शीतगृहात साठवता येणार असल्याचे तीन ठराव त्यांनी मांडले व त्यास समितीने मान्यता दिली.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन ट्रान्सफार्मर तातडीने खरेदी करावी, जे कंत्राटादार कामे हे वेळेवर करत नसतील तर त्यांना वीज वितरण कंपनीने त्यांच्याकडे असलेले कामे काढून घ्यावीत व ही कामे त्वरित सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,पाणीपुरवठा योजना सुरू करण्यापूर्वी पाण्याचे स्त्रोत निश्चित करावे. त्यानंतरच योजनांची अंमलबजावणी करावी, रोजगार हमी योजनेच्या 60 टक्के अकुशल आणि 40 टक्के कुशल कामाचे स्वतंत्र अंदाजपत्रके तयार करावीत असे ठराव त्यांनी मांडले.

आमदार कैलास पाटील यांनी जिल्ह्यात आवश्यक असलेल्या दहा ठिकाणी वीज वितरण कंपनीने सब स्टेशनची कामे सुरू करावी,पीक कर्ज वाटप करताना बँकांनी पिकांचे स्केल ऑफ फायनान्स वाढवण्यात यावे,त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक विहींरींच्या पाण्याची तपासणी मोहीम तातडीने हाती घ्यावी असे ठराव यावेळी मांडले.

जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये मार्च 2025 अखेर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 407 कोटी 98 लक्ष, अनुसुचित जाती उपयोजना 74 कोटी 97 लक्ष आणि आदिवासी उपयोजना क्षेत्रबाह्य योजना 12 कोटी 99 लक्ष असे एकूण 495 कोटी 96 लक्ष रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाची टक्केवारी 99.99 टक्के इतकी आहे. तर जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 या वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 457 कोटी रुपये, अनुसुचित जाती उपयोजना 75 कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजना क्षेत्रबाह्य योजनेसाठी 2 कोटी 52 लक्ष रुपये अर्थसंकल्पीत तरतुद करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांनी दिली.

यावेळी विविध यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाकडून जिल्ह्याच्या विकासासाठी प्राप्त निधीतून करण्यात आलेली व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. सभेच्या प्रारंभी जम्मू काश्मिरमधील पहेलगाम येथे आंतकवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना उपस्थितांनी उभे राहून श्रध्दांजली अर्पण केली.

  • Related Posts

    शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन

    Spread the love

    Spread the loveपुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पदयात्रेचे काटेकोर नियोजन करून यशस्वी करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार पुणे  – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण…

    सोलापूर रेल्वे विभागातील ३० रेल्वे कर्मचारी आणि ९ विभागांचा गौरव

    Spread the love

    Spread the loveसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सिद्धेश्वर रेल्वे ऑफिसर्स क्लब ऑडिटोरियम हॉल, सोलापूर येथे ७० वा रेल्वे आठवडा २०२५ कार्यक्रम आयोजित केला होता. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *