मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात
धाराशिव – जिल्ह्यातील शेवटच्या घटकाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुक्ष्म नियोजनातून काम करण्यात येईल.जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी आणि जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून लागलेला शिक्का पुसण्यासाठी तसेच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची, उपक्रमांची,प्रकल्पांची व अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिली.
आज १ मे रोजी ६६ व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक ……. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती,अपर पोलीस अधीक्षक अफशत आमना,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव,उपजिल्हाधिकारी
पाटील……… यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.सरनाईक बोलतांना म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजनेतून सन २०२४ -२५ या वर्षात ४९५ कोटी ९६ लक्ष रुपये निधी खर्च करण्यात आला.राज्य शासनाच्या महत्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून जिल्ह्यातील जिल्हयातील ४ लक्ष ७ हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हयात १४ हजार ५३३ महिला स्वयंसहायता समुह तर ७८२ ग्रामसंघ व ५५ प्रभाग संघ स्थापन करून या प्रभागसंघांना ४ कोटी ८० लक्ष रुपये निधी जिल्हा नियोजन समितीकडून दिला आहे. बचतगटांच्या उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी तुळजापूर येथे उमेद मॉल उभारण्यात येणार असून जिल्हयातील १४ हजार स्वयंसहाय्यता समुहांना ५३२ कोटी रुपये कर्ज उपलब्ध करुन दिले. त्यामुळे बचतगटाच्या महिला विविध छोटया उद्योग व्यवसायातून स्वावलंबी व सक्षम होतांना दिसत असल्याचेही पालकमंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ९ हजार ३९० कुटुंबाना १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,
सन 2024-25 च्या हंगामात जिल्हयातील 14 हजार 256 शेतकऱ्यांचे 3 लक्ष 75 हजार 770 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या सोयाबीनचे 183 कोटी 82 लक्ष रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आरोग्याच्या बाबतीत धाराशिव येथे 500 खाटांचे जिल्हा रुग्णालयास 16 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाने मंजुरी दिली. धाराशिव येथे 23 कोटी 75 लक्ष रुपयांच्या निधीतून 50 खाटांचे क्रिटिकल केअर युनीटचे बांधकाम सुरु आहे. 200 खाटांच्या स्त्री रुग्णालयाला शासनाने मंजुरी दिली असुन लवकरच बांधकाम सुरु होणार आहे. कॅथलॅबचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले आहे. परंडा येथे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय, 100 खाटांचे स्त्री रुग्णालयाचे बांधकाम, भूम येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मान्यता दिली असुन बांधकाम सुरु आहे. आरसीएच कार्यक्रमाअंतर्गत पाच वर्षात सातत्याने बालमृत्यू कमी करणारा जिल्हा म्हणून राज्यात प्रथम पुरस्कार, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमामध्ये उत्तम कामगिरी करणारा जिल्हा श्रेणीमध्ये द्वितीय पुरस्कार, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमअंतर्गत 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय पातळीवर मुल्यांकन प्रमाणपत्र प्राप्त केल्याबद्दल राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. धाराशिवच्या आरोग्यविषयक सुधारणांची दखल राज्यस्तरावर घेतल्याची ही पावती आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांच्या माध्यमातून 800 कर्ज प्रस्ताव सन 2024-25 या वर्षात मंजूर करण्यात आले. राज्यात सलग तीन वर्षे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारा धाराशिव हा एकमेव जिल्हा ठरला आहे. धाराशिव येथे 15 एप्रिल 2025 रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये 55 उद्योजकांसोबत 1 हजार 142 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यामधून 2 हजार 197 रोजगार निर्मिती होणार आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडुन 1194 लाभार्थ्यांना बॅकेने 1 हजार 80 कोटी 70 लक्ष रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.
जिल्हयातील 316 शेतकऱ्यांना 2 कोटी 97 लक्ष रुपये अनुदान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत वितरीत केले. डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 110 शेतकरी गट व 11 शेतकरी उत्पादक कंपन्या जैविक निविष्ठा तयार करुन निविष्ठा केंद्र स्थापन करणार असल्यामुळे जिल्हयातील 5 हजार 500 शेतकऱ्यांचे 5 हजार 500 हेक्टर क्षेत्र सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली येणार आहे.
जिल्हयातील भुजल पातळी वाढविण्याकरीता कृषी व पंचायत विभागाकडुन 12 लक्ष 44 हजार जलतारा प्रकल्प तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2024-25 च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन पीकांच्या नुकसान भरपाईपोटी 4 लक्ष 58 हजार 417 शेतकऱ्यांना 220 कोटी 99 लक्ष रुपये विमा भरपाई वितरीत करण्यात आली आहे.
स्वच्छ भारत मिशन टप्पा -2 अंतर्गत जिल्हयातील 718 गावे हागणदरी मुक्त म्हणून घोषीत केली आहे. त्यापैकी एकूण गावाच्या 78 टक्के गांवे ओडीएफ प्लस मॉडेल म्हणून जाहिर झाली आहे. जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी एकरी 1 ते दिड लाख रुपयांच्यावर उत्पादन घेत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तुती लागवडीत धाराशिव जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. मनरेगातून 1 हजार 380 एकरवर तुती लागवड केली असून 1 हजार 433 शेतकऱ्यांनी 645 मेट्रीक टन रेशीम कोषाचे उत्पादन घेतले आहे.
जिल्ह्यामध्ये अंदाजे 10 हजार कि.मी. लांबीच्या 1 हजार 387 शेतरस्त्यांचे मजबुतीकरण अभिसरणातून, सीएसआर फंडातून व लोकसहभागातून करण्यात येणार आहे.
एसटीच्या सेवेचा लाभ सर्वसामान्य नागरीकांपासून तर विद्यार्थ्यांना मिळत आहे. सन 2024-25 या वर्षात अहिल्यादेवी मोफत पास सवलत योजनेचा लाभ जिल्हयातील 40 हजार विद्यार्थ्यानींनी, 50 टक्के ज्येष्ठ नागरीक सवलतीचा लाभ 16 लक्ष 49 हजार नागरीकांनी, अमृत ज्येष्ठ नागरीक सवलतीचा लाभ 1 कोटी 26 नागरीकांनी, महिला सन्मान योजनेचा लाभ 1 कोटी 33 महिलांनी घेतला आहे. धाराशिव विभागाला नवीन 35 बसेस प्राप्त झाल्या आहे .या बसेसचा वापर लांब व मध्यम पल्ल्यांसाठी करण्यात येत आहे.
सन 2024-25 या वर्षात जिल्हा परिषदेच्या 30 शाळांमधुन सेमी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थी गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत शाळा भेट अभियान राबविण्यात येत आहे. महावाचन चळवळ, स्पर्धा परिक्षा एक चळवळ,महिन्याच्या प्रत्येक शनिवारी दफ्तरमुक्त शाळा,माझा वर्ग माझी जबाबदारी,माझी शाळा सुंदर शाळा असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत सन 2024-25 या वर्षात 269 जलसाठ्यामधुन तब्बल 1 कोटी 10 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला. 10 हजार शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ वाहून नेवून 11 हजार हेक्टर क्षेत्रात पसरविल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत झाली आहे.
शेतकऱ्यांनी विविध कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेत सहभागी होवून ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. ॲग्रीस्टॅक योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवांनी नजीकच्या सामान्य सुविधा केंद्रात (सीएससी) जावून नोंदणी करावी. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ॲग्रीस्टॅक योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहनही मी याप्रसंगी करतो.
जिल्ह्यात मोठ़या प्रमाणात वृक्षलागवड करण्याच्या दृष्टीने यंदाच्या पावसाळ्यात वृक्षलागवडीचे नियेाजन करण्यात आले आहे. 56 लक्ष 60 हजार देशी वृक्षांची लागवड लोकसहभाग आणि विविध यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. एकाच दिवशी 15 लक्ष वृक्षलागवड लोकसहभागातून करण्याचे निश्चित केले असून यात सर्व यंत्रणांनी सहभागी होवून हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहनही त्यांनी केले.