


धाराशिव – सन २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती नंतरच्या गरजांचे मूल्यांकन (PDNA) करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथक सी.पी.मोहन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दाखल झाले आहे.हे पथक जिल्ह्यांमध्ये बाधित भागाची आज प्रत्यक्ष पाहणी करणार आहे,त्यानंतर जिल्ह्यात विविध क्षेत्रात झालेल्या नुकसानीचा सविस्तर PDNA अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे सादर करणार आहे.
आज सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिके,शेतीजमीन,पशुधन,रस्ते, सार्वजनिक मालमत्ता तसेच खाजगी मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीची माहिती पथकाला सादरीकरणातून दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्यासह विविध विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.