‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२६’ग्रामसभा,शाळा व महाविद्यालयातून व्यापक प्रमाणात जनजागृती कराजिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

Spread the love

जिल्हा समन्वय समितीची बैठक

धाराशिव – जिल्ह्यात गावपातळीवर आयोजित ग्रामसभेतून तसेच शाळा – महाविद्यालयातून जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करा.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

आज स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२६ प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कृती प्रभावीपणे अंमलात आणण्याबाबत जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिम २०२६ चे घोषवाक्य “भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया” हे आहे.२६ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामसभांमध्ये आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन,जिल्हाधिकारी यांचे आवाहन वाचन,सरपंच / ग्रामप्रमुख यांचे कुष्ठरोगाविषयी भाषण,“सपना संदेश” वाचन (हा संदेश शाळकरी मुलीमार्फत दिला जाणार असून तिला ‘सपना’ हे नाव देण्यात आले आहे),कुष्ठरोग प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.रोगमुक्त कुष्ठरुग्ण उपलब्ध असल्यास त्याचा सत्कार करून योग्य उपचाराने कुष्ठरोग बरा होतो याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी ध्वजारोहणानंतर सर्व शासकीय कार्यालये,आरोग्य संस्था, शाळा व महाविद्यालये येथे जिल्हाधिकारी यांचे आवाहन वाचन करून कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.३० जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुण्यतिथी दिन “कुष्ठरोग निवारण दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कुष्ठरोग निवारण पंधरवडा राबविण्यात येणार असून, या पंधरवड्यात पुढीलप्रमाणे आरोग्य शिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत.शाळांमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग प्रतिज्ञेचे वाचन करण्यात येणार आहे.

शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोगाबाबतचे संदेश लिहिण्यात येणार आहेत.शाळांमध्ये पथनाट्य, प्रश्नमंजुषा स्पर्धा,निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी,कवितावाचन, रांगोळी स्पर्धा इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी आयोजित करण्यात येणार आहे. कुष्ठरोगाचे लवकर निदान व वेळेवर उपचाराचे महत्त्व तसेच कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याबाबत प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. स्थानिक महिला मंडळे,बचत गट व तरुण मंडळांच्या सभा आयोजित करण्यात येणार आहेत.खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.शाश्वत विकास ध्येयांतर्गत केंद्र शासनाने सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसार हे उद्दिष्ट निश्चित केले आहे.तथापि,नियमित व विशेष सर्वेक्षणांमध्ये काही उपेक्षित, वंचित किंवा दुर्लक्षित गटातील व्यक्ती तपासणीपासून वंचित राहतात.

या पार्श्वभूमीवर दिनांक ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “कुष्ठरोगमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)” हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.या कार्यक्रमांतर्गत पुढील तपासण्या करण्यात येणार आहेत.विटभट्टी कामगारांची तपासणी,खडी केंद्रांवरील कामगारांची तपासणी, साखर/गूळ पावडर कारखाना कामगार व ऊसतोड मजुरांची तपासणी,आश्रमशाळा व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची तपासणी, बांधकाम साईटवरील कामगारांची तपासणी,जेलमधील कैद्यांची तपासणी,स्थलांतरित लोकांची तपासणी इत्यादी.

या बैठकीची प्रस्तावना डॉ.एम.आर. कोरे, सचिव,जिल्हा समन्वय समिती तथा सहाय्यक संचालक,आरोग्य सेवा (कुष्ठरोग), धाराशिव यांनी केली.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा समन्वय समिती श्री.पुजार यांनी जिल्ह्यात प्रभावीपणे कुष्ठरोग जनजागृती राबविण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे,असे आवाहन केले.तसेच जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी शाळा व महाविद्यालयातून अधिकाधिक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीस सर्व सदस्य उपस्थित होते.अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यक्षेत्रात आवश्यक सूचना दिल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांनी सांगितले.

अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी गावनिहाय पथके तयार करून सर्व ग्रामसभांच्या ठिकाणी एक आरोग्य कर्मचारी किंवा आशा कार्यकर्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास यांनी दिली.

  • Related Posts

    ‘काचबिंदू’विषयी जनजागृती अत्यावश्यक ; वेळोवेळी तपासणी केल्यास अंधत्व टाळता येते. डॉ.धनंजय चाकुरकर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – काचबिंदू या डोळ्यांच्या आजाराची लक्षणे सहसा सहज ओळखता येत नसल्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन योग्य वेळी…

    कुष्ठरोग नियंत्रणात राज्यात पहिला क्रमांक; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – : सन २०२५-२६ या वर्षात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल धाराशिव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.राज्यस्तरावर एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *