धाराशिव – राज्यातील नवउद्योजक,उद्योग क्षेत्र आणि शासकीय यंत्रणांमधील समन्वय अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने इग्नाईट कन्व्हेंशन २०२६ चे यशस्वी आयोजन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यावेळी अध्यक्षस्थानी होते.
जिल्हाधिकारी श्री.पुजार उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,भूम व परंडा तालुक्यातील उत्पादित केळी व तुळजापूर तालुक्यातील द्राक्ष हे कृषी उत्पादने निर्यात होत असून त्यासोबतच उद्योग घटकांकडून प्रक्रिया केलेले उत्पादने निर्यात होणे आवश्यक असल्याचे सांगितले.तसेच जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालासाठी आता ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात आलेले असून गटांनी उत्पादित केलेल्या माल विक्रीस मोठ्या प्रमाणात वाव मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.राजकुमार मोरे यांनी कृषी माल प्रक्रिया व निर्यात याबाबत सविस्तर माहिती दिली.समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी अनुसूचित जाती जमातीमधील उद्योजकांसाठी विशेष सवलती असून त्यांनी या योजनेच्या माध्यमातून उद्योजक होण्याचे आवाहन केले.
कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.संजय गुरव यांनी जिल्ह्यातील उद्योजकांसाठी पूरक असणारे कुशल मनुष्यबळ उद्योजकांच्या मदतीने तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. डीजीएफटीच्या प्रियंका गवई यांनी आयात निर्यात कार्यपद्धती अत्यंत सोप्या भाषेत सांगून जास्तीत जास्त परकीय चलन मिळविण्यासाठी निर्यातीकडे वळणे आवश्यक असल्याचे सांगितले. डीजीएफटीच्या वेबसाईटवर “निर्यात बंधू” हे ॲप असून ते अत्यंत प्रभावी असे माध्यम आहे.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या ॲपचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भारतीय डाकचे श्री.सोनटक्के,न्यू इंडिया इन्शुरन्सच्या श्रीमती मालती भोसले, उद्योजक संघटनेचे श्री.कोंढारे व विभागीय कार्यालयाचे उद्योग उपसंचालक श्री.भोंबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच अपेडाचे श्री.प्रशांत वाघमारे व इज ऑफ डूइंग बिजनेसबाबत मैत्रीचे श्री.हजारे यांनी उपस्थिताना ऑनलाईन मार्गदर्शन केले.
प्रास्तावितकातून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.अमोल बळे यांनी जिल्ह्यातील उद्योजकता व निर्यात वाढीसाठी शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबाबतची माहिती दिली.
स्टार्टअप्स,एमएसएमई,मोठे उद्योगसमूह, धोरणकर्ते,तंत्रज्ञान तज्ज्ञ तसेच प्रशासकीय अधिकारी यांचा सक्रिय सहभाग लाभला. नवोन्मेष,उद्योजकता आणि रोजगारनिर्मिती यांना चालना देणे हा या कार्यशाळेमागील मुख्य हेतू होता.नव्या कल्पनांना उद्योगात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेली धोरणात्मक मदत,वित्तपुरवठा, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञान यावर सखोल चर्चा करण्यात आली.
या कन्व्हेंशनमध्ये विविध सत्रांद्वारे स्टार्टअप्सना येणाऱ्या अडचणी,शासनाच्या विविध योजना,अनुदाने, कर्जसुविधा तसेच उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.DGFT,उद्योग विभाग तसेच इतर संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थितांना माहिती दिली आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंकांचे निरसन केले.
तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धिमत्ता,डिजिटल सेवा,हरित ऊर्जा,कृषी-आधारित उद्योग आणि उत्पादन क्षेत्रातील संधी यावर विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले.या सत्रांमुळे उद्योजकांना भविष्यातील संधी आणि आव्हाने यांचा अंदाज आला.
या कार्यक्रमामुळे नवउद्योजकांना प्रेरणा मिळाली असून उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.शासन आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक बळकट होऊन राज्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.इग्नाईट कन्व्हेंशन २०२६ हे केवळ परिषद न राहता, उद्योजकांसाठी दिशा दाखवणारे आणि नवोन्मेषाला चालना देणारे एक प्रभावी व्यासपीठ ठरले आहे.