धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज.

कारगिल विजय दिनानिमित्त जिल्हा परिषद धाराशिव येथील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात “कारगिल विजय दिन” उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांच्या हस्ते कारगिल युद्धातील शहीद वीर जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमास अतिरिक्त उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी ज्ञानराज पौळ व विविध विभागाचे विभागप्रमुख/खाते प्रमुख उपस्थित होते. सहाय्यके प्रशासन अधिकारी प्रभाकर चौगुले यांनी कारगिल विजय दिनाचे ऐतिहासिक महत्त्व, भारतीय सैन्याचे शौर्य, पराक्रम आणि देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाविषयी उपस्थितांना माहिती दिली. त्यांनी कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्यगाथेचे स्मरण करून उपस्थितांना राष्ट्रप्रेम व देशसेवेची प्रेरणा दिली.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद धाराशिवच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण देशभक्तीपर घोषणांनी भारावून गेले असून उपस्थितांनी शहीद जवानांच्या त्यागास कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. माहिती व प्रसिद्धी कक्षाचे जनसंपर्क अधिकारी पद्माकर कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे वृत्त संकलन व संपादन केले.