धाराशिव/विश्व प्रशांत न्यूज.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तहसील कार्यालयात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलक अत्यंत आक्रमक झाले असून, त्यांनी थेट तहसीलदारांच्या केबिनमधील खुर्ची बाहेर आणून जाळली. ही घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उमरगा तहसील कार्यालयात घडली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि आरक्षणाच्या मागणीसाठी हा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे.
प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, मराठा आंदोलक अचानक तहसीलदारांच्या दालनात घुसले. त्या वेळी सकाळी तहसीलदार उपस्थित नव्हते. आंदोलकांनी तिथल्या शिपायाला बाजूला सारून तहसीलदारांची खुर्ची ओढून आवारात आणली आणि ती पेटवून दिली. या आगीत खुर्ची पूर्णपणे जळून खाक झाली. आंदोलकांनी शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे सरकारी कार्यालय आणि परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळावरून चार आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या चारही आंदोलकांवर उमरगा तहसील कार्यालयात शिपायाला धक्काबुक्की करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा पोलीस प्रशासनाने उमरगा तहसील कार्यालय आणि शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे जेणेकरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असून, सरकारने त्यांच्याशी चर्चा थांबवल्यामुळे मराठा समाज तीव्र आक्रमक झाला आहे. मराठवाड्यात विविध ठिकाणी आंदोलनाचा भडका उडाला आहे. धाराशिवमध्ये यापूर्वी कडेकोट बंद पाळण्यात आला होता. आज नांदेडमधील हदगाव आणि बरडशेवाळा येथे आंदोलकांनी नांदेड-नागपूर महामार्ग रोखून धरला, ज्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील पोहरेगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक थेट 350 फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत. नाशिकच्या चांदवडसह राज्यातील विविध भागांतून मराठा बांधवांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत धडक देण्याचा इशारा दिला आहे.