तापाचा वाढता धोका ; जिल्ह्यात ‘आरोग्य अलर्ट’

Spread the love

धाराशिव – जिल्ह्यात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.वाढत्या तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासह अन्य कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक,शाळा- महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांसाठी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.घर आणि परिसरात डासांची पैदास होणार नाही याची खबरदारी घेण्याबरोबरच ताप दोन दिवसांपेक्षा अधिक काळ राहिल्यास तातडीने शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तापाकडे केवळ ऋतुबदलाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेणे महत्त्वाचे आहे.घरातील एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास त्याची योग्य काळजी घेण्याबरोबरच घरापासून शाळा,महाविद्यालय आणि कार्यालयापर्यंत स्वच्छता राखल्यास आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत होऊ शकते. यासाठी आरोग्य विभागाने विविध स्तरांवर घ्यावयाच्या खबरदारीची सविस्तर रूपरेषा दिली आहे.

आठवड्यातून एक दिवस पाण्याची भांडी पूर्ण कोरडी करा
नागरिकांनी सर्वप्रथम डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करण्यावर भर द्यावा.घराभोवती कुठेही पाणी साचू देऊ नये.कुलर, पाण्याच्या टाक्या आणि कुंड्यांखालील ट्रे आठवड्यातून एकदा पूर्ण रिकामे करून वाळवावेत.अशा पद्धतीने नियमित ‘कोरडा दिवस’ पाळावा.डासांच्या चाव्यापासून वैयक्तिक संरक्षणासाठी अंग पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे वापरावेत.रात्री तसेच सकाळच्या वेळी डास प्रतिबंधक क्रीम किंवा मलम लावावे अथवा मच्छरदाणीचा वापर करावा.पिण्यासाठी स्वच्छ, गाळलेले आणि उकळलेले पाणी वापरावे.शिळे तसेच उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन-सीयुक्त आहार,फळे आणि पाणी, नारळपाणी,लिंबूपाणी यांसारखे भरपूर द्रवपदार्थ घ्यावेत.पुरेशी विश्रांतीही घ्यावी.

दोन दिवसांपेक्षा अधिक ताप- तपासणी करा
ताप आल्यानंतर स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळावे.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ‘पॅरासिटामॉल’ व्यतिरिक्त अस्पिरिन, आयब्युप्रोफेनसारख्या वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत.
दोन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप कायम असल्यास तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. आवश्यकतेनुसार डेंग्यू,मलेरिया अथवा विषाणुजन्य आजाराच्या निदानासाठी रक्ताची तपासणी करावी.अंगावर पुरळ येणे,सतत उलट्या होणे,हिरड्यांमधून रक्त येणे किंवा अत्यंत अशक्तपणा जाणवणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसल्यास विलंब न करता रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करावे.

शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.शाळा,महाविद्यालये आणि अन्य शिक्षण संस्थांनी परिसर,मैदान आणि छतावर पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.पाण्याच्या टाक्यांची झाकणे घट्ट बंद ठेवावीत.अंधाऱ्या आणि दमट जागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश राहील याची काळजी घ्यावी.

डासांच्या चाव्यापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि लांब पँट घालण्याबाबत सूचना कराव्यात. वर्गशिक्षकांनी दररोज सकाळच्या परिपाठाच्या वेळी ताप असलेल्या किंवा आजारी दिसणाऱ्या विद्यार्थ्यांची पाहणी करावी आणि गरज असल्यास त्यांना उपचारासाठी संदर्भित करावे.
ताप किंवा संसर्गाची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याबाबत पालकांनाही सूचित करावे.शाळेत प्रथमोपचार पेटी आणि थर्मामीटर सज्ज ठेवावा.विद्यार्थी अचानक आजारी पडल्यास पालकांना बोलावून त्याला वैद्यकीय उपचारासाठी पाठवावे.विद्यार्थ्याला ताप असल्यास योग्य विश्रांती घेण्याबाबत सूचना द्याव्यात.
परिपाठ अथवा तासिकेदरम्यान विद्यार्थ्यांना नियमित हात धुणे, वैयक्तिक आणि परिसर स्वच्छता राखणे तसेच डास प्रतिबंधाचे महत्त्व समजावून सांगून आरोग्यविषयक जनजागृती करावी.

आठ दिवसांनी पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता
शाळांमधील पाण्याच्या टाक्यांची दर आठ दिवसांनी स्वच्छता करावी. पिण्यासाठी आरओ किंवा उकळलेल्या पाण्याची व्यवस्था करावी आणि सर्व पाणीसाठे योग्य प्रकारे झाकून ठेवावेत. स्वच्छतागृहांमध्ये साबण आणि पाण्याचा पुरेसा पुरवठा असल्याची खात्री करावी.दररोज फिनाईल किंवा ब्लिचिंगसारख्या जंतुनाशकांचा वापर करून स्वच्छता राखावी.तालुका आरोग्य अधिकारी अथवा नगरपालिकेशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार शाळेच्या परिसरात कीटकनाशक फवारणी आणि धुरीकरण (फॉगिंग) करून घ्यावे.सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगावे.दररोज आंघोळ करणे, वारंवार हात धुणे आदी सवयी अंगीकारण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे.विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व पटवून द्यावे. मुलांच्या आहारामध्ये किमान एक फळ आणि संतुलित आहाराचा समावेश करण्यावर भर द्यावा.
वर्गखोल्यांच्या खिडक्यांना डासप्रतिरोधक जाळ्या बसवाव्यात.पाण्याच्या पाईपलाही जाळी बसवावी.प्रत्येक वर्गखोलीत पुरेसा सूर्यप्रकाश अथवा कृत्रिम प्रकाश राहील आणि हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

सरकारी कार्यालयांत दर शुक्रवारी ‘कोरडा दिवस’
शासकीय कार्यालयांसाठीही स्वतंत्र सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक सरकारी कार्यालयात दर शुक्रवारी ‘कोरडा दिवस’ पाळावा. कार्यालयाच्या छतावर,गॅलरीत किंवा आवारात पडलेले जुने टायर, फुटके प्लास्टिक,कुंड्यांचे ट्रे आणि अन्य टाकाऊ वस्तूंची तात्काळ विल्हेवाट लावावी.पिण्याच्या पाण्याच्या टाक्या,कुलर आणि सिमेंटच्या टाक्या आठवड्यातून एकदा पूर्ण रिकाम्या करून वाळवाव्यात.कार्यालय परिसरातील सांडपाण्याच्या गटारी तसेच साचलेल्या पाण्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत म्हणजे नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीमार्फत अळीनाशक औषधाची किंवा आवश्यकतेनुसार जळलेल्या ऑइलची फवारणी करावी.डासांचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या ठिकाणी सायंकाळच्या वेळी धुरीकरण (फॉगिंग) करून घ्यावे.

कर्मचारी-अभ्यागतांना शुद्ध पाणी द्या
कार्यालयातील कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी स्वच्छ,उकळलेले किंवा शुद्ध आरओ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. स्वच्छतागृहांमध्ये दररोज फिनाईल किंवा ब्लिचिंगसारख्या जंतुनाशक द्रव्यांचा वापर करून स्वच्छता राखावी.हात धुण्यासाठी साबण किंवा हँडवॉश उपलब्ध करून द्यावा.शासकीय कार्यालयाच्या आवारातील उपहारगृहांमध्ये अन्नपदार्थ योग्यप्रकारे झाकून ठेवले आहेत की नाही,याची संबंधित कार्यालयप्रमुखांनी तपासणी करावी.

कार्यालयांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश अथवा कृत्रिम प्रकाश राहील आणि हवा खेळती राहील अशी व्यवस्था करावी.एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरी क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजाराने ग्रस्त व्यक्ती असल्यास संबंधित कर्मचाऱ्यानेही आवश्यक वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
कार्यालयामध्ये शक्यतो कुलर अथवा एसीचा वापर टाळावा. वापरात असलेल्या कुलरमधील पाणी नियमितपणे बदलावे.जुने व वापरण्यायोग्य नसलेले कुलर असल्यास त्यांचे नियमानुसार निर्लेखन करावे.

ताप असलेल्या कर्मचाऱ्यांना विश्रांती द्या
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात असताना शक्यतो पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत आणि डास प्रतिबंधक मलम किंवा क्रीमचा वापर करावा.पिण्यासाठी शक्यतो स्वतःची पाण्याची बाटली घरून आणावी.कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याला ताप, सर्दी,खोकला किंवा अंगावर पुरळ येण्यासारखी लक्षणे दिसल्यास त्याला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवावे.ताप असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे संभाव्य संसर्गाचा प्रसार होऊ नये आणि संबंधित कर्मचाऱ्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ मिळावा,यासाठी त्याला आवश्यक विश्रांती घेण्याची परवानगी द्यावी.

घरातील पाण्याच्या एका छोट्याशा साठ्यापासून शाळेच्या मैदानापर्यंत आणि कार्यालयाच्या परिसरापर्यंत प्रत्येक ठिकाणी घेतलेली साधी खबरदारी डासांची पैदास रोखण्यास उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता स्वच्छता,प्रतिबंध आणि वेळेवर उपचार ही त्रिसूत्री नागरिकांनी अंगीकारावी,असे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमधून स्पष्ट करण्यात आले आहे.

  • Related Posts

    नेत्रदानाचा संदेश घेऊन धाराशिव येथे जनजागरण रॅली४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त उपक्रम ; विद्यार्थी,शिक्षकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – नेत्रदानातून गरजूंच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश निर्माण होऊ शकतो,’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी आज ४ सप्टेंबर रोजी…

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने रक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न

    Spread the love

    Spread the loveधाराशिव :- गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन शहरात झाले,मल्टी पर्पज जिल्हा परिषद कन्या शाळेतील पटांगणात मुक्काम असता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव यांच्या वतीने रक्तदान शिबीर तर जिल्हा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *