धाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा प्रादुर्भाव आढळून येत असून,या किडी रोपावस्थेतील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.या पार्श्वभूमीवर मौजे भोगजी (ता.कळंब) तसेच इतर बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून,या किडींच्या समूळ नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक स्तरावर तातडीने एकात्मिक कीड व्यवस्थापनाची अंमलबजावणी करावी,असे संयुक्त आवाहन कृषी विद्यावेत्ता डॉ.अरुण गुटे आणि उपविभागीय कृषी अधिकारी श्री. महादेव आसलकर यांनी केले आहे.
शंखी गोगलगाय ही प्रामुख्याने निशाचर कीड असून ती रात्रीच्या वेळी सक्रिय होते.विशेषतः सोयाबीनच्या रोपावस्थेत ही कीड मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांनी वेळेवर नियंत्रणात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
प्रतिबंधात्मक व प्राथमिक उपाययोजना
सोयाबीनच्या पेरणीनंतर संपूर्ण शेताभोवती, बांधाच्या आतल्या बाजूने सुमारे ५ सेंटीमीटर रुंदीचा चुन्याचा पट्टा ओढावा.यामुळे गोगलगाईंचा शेतात प्रवेश कमी होण्यास मदत होते.गोगलगाय व इतर किडींच्या नियंत्रणासाठी केवळ वैयक्तिक उपाय न करता गावपातळीवर किंवा परिसरातील शेतकऱ्यांनी सामूहिक मोहीम राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
रासायनिक नियंत्रणासाठी ‘स्नेलकील’चा वापर
सोयाबीन पेरणीनंतर तात्काळ बांधाच्या आतल्या बाजूने मेटलडिहाईड २.५ टक्के (स्नेलकील) या औषधाच्या पेलेटचे छोटे गोळे करून संपूर्ण शेताभोवती ५ ते ७ फूट अंतरावर एक-एक गोळी टाकावी.स्नेलकील हे प्रलोभक स्वरूपाचे औषध असून ते गोगलगाईंना आकर्षित करते. गोगलगाईने या गोळीला चाटल्यानंतर सुमारे ४ ते ५ तासांत तिच्या शरीरातील स्राव बाहेर पडतो आणि ती नियंत्रणात येते. बांधाव्यतिरिक्त शेताच्या आतील भागातही गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्यास प्रत्येक चार ओळींनंतर ओळीच्या बाजूने ५ फूट अंतरावर स्नेलकीलच्या गोळ्या टाकाव्यात.
पैसा/वाणी (Millipede) किडीच्या नियंत्रणासाठी उपाय
शेतात पैसा किंवा वाणी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी बाजारात उपलब्ध असलेले क्लोरोपायरीफॉस १.५ टक्के किंवा फिप्रोनील ०.३ टक्के दाणेदार स्वरूपातील औषध ५ किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पेरावे.
रोपावस्थेत जैविक व भौतिक नियंत्रणालाही प्राधान्य
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रति एकर दहा ठिकाणी गव्हाचे ढीग किंवा पाण्यात भिजविलेला सुतळी बारदाना ठेवावा.सकाळी ६ ते ८ या वेळेत त्या ढिगाखाली किंवा बारदानाखाली जमा झालेल्या गोगलगाई गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.कृषी विभागाने शेतकऱ्यांना गोगलगाय तसेच पैसा/वाणी किडीच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सामूहिकरीत्या वरील उपाययोजना तातडीने राबविल्यास संभाव्य नुकसान टाळता येणार आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी,मंडल कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहनही डॉ.अरुण गुटे आणि श्री.महादेव आसलकर यांनी केले आहे.