
भुम 🙁 प्रतिनिधी ) तालुक्यातील वंजारवाडी मार्गावरील भुम-बार्शी-कोरेगाव मार्गावरील भवानी मंदिर ते सोलापूर सरहद्दपर्यंतचा रस्ता बांधकाम विभाग धाराशिव यांच्या हद्दीत येत असून, गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब आणि धोकादायक रस्त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने वंजारवाडी येथील प्रभाकर डोंबाळे यांनी संतप्त भूमिका घेत भुम तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. संबंधित रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास गावातील उंच पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारून आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.