Spread the love

धाराशिव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित 32 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या 29 आणि 30 मे 2026 रोजी धाराशिव येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या भव्य साहित्य सोहळ्याला दिवंगत लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरी असे नाव देण्यात आल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे उपस्थित होते. संमेलनाचे स्वरूप अत्यंत वैविध्यपूर्ण ठेवण्यात आले असून ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, परिसंवाद, चर्चासत्र, कथाकथन आणि कवी संमेलन अशा विविध साहित्यिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

या दोन दिवसीय साहित्य पर्वासाठी देशभरातून सुमारे 900 साहित्यिक, कवी, लेखक आणि नवोदित साहित्यिक धाराशिवात दाखल होणार असल्याने जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार आहे.

या आधी हे संमेलन पुणे, मुंबई, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, उदगीर, जव्हार, सांगली, कराड, गोंदिया आणि तुळजापूर अशा विविध शहरांत यशस्वीरीत्या पार पडले आहे.

या प्रतिष्ठित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी यापूर्वी द. मा. मिरासदार, नारायण सुर्वे, सुरेश भट, केशव मेश्राम, रा. रं. बोराडे, नरेंद्र जाधव, लक्ष्मण माने, शिवाजी सावंत आणि गंगाधर पानतावणे यांसारख्या दिग्गज साहित्यिकांनी काम पाहिले आहे. तसेच जावेद अख्तर, पु. ल. देशपांडे, शरद पवार आणि ना. धों. महानोर यांसारख्या मान्यवरांनी उद्घाटनाची धुरा सांभाळली होती.

यंदाचे संमेलन धाराशिवच्या साहित्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार असून नवोदित साहित्यिकांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा सोहळा ठरणार आहे.