पत्रके,भित्तीपत्रके छापण्यापूर्वी मुद्रकांनी प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक ; उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
धाराशिव – विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी घोषित केला असून,त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.या पार्श्वभूमीवर निवडणूक पत्रके आणि भित्तीपत्रकांच्या छपाईबाबत भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोग,नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १२७-अ अन्वये निवडणूक पत्रके व भित्तीपत्रकांच्या छपाईबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत.त्यानुसार निवडणुकीशी संबंधित छपाईची कामे करणाऱ्या सर्व प्रेसधारकांनी विहित प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे.
निवडणूक पत्रके किंवा भित्तीपत्रकांची छपाई करणाऱ्या प्रेसधारकांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,धाराशिव यांच्याकडे उपचिटणीस शाखेत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र त्वरित सादर करणे बंधनकारक आहे. याबाबत अधिक माहिती तसेच प्रतिज्ञापत्राचा नमुना मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,धाराशिव यांच्या कार्यालयातील उपचिटणीस शाखेशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,धाराशिव यांच्याकडे आवश्यक प्रतिज्ञापत्र सादर केल्याशिवाय विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी अथवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित निवडणूक पत्रके किंवा भित्तीपत्रके छापून देऊ नयेत,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्देशांचे उल्लंघन करून कोणत्याही प्रेसधारकाने उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा राजकीय पक्षासाठी निवडणूक साहित्याची छपाई केल्याचे आढळून आल्यास संबंधित प्रेसधारकाविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबतच्या सविस्तर सूचना कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील उपचिटणीस शाखेत उपलब्ध आहेत.ही जाहीर सूचना धाराशिव येथून २८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर निवडणूक व्यवस्थापनासंबंधी सूचना,नियम व मार्गदर्शक माहिती उपलब्ध आहे.