

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा बैठक
धाराशिव – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि विहित वेळेत पार पाडण्यासाठी विविध कक्षांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपापल्या जबाबदाऱ्या अत्यंत दक्षतेने आणि वेळेत पार पाडाव्यात,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
यांनी दिले.
भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम २२ सप्टेंबर रोजी घोषित केला असून,त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक टप्प्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज,३० सप्टेंबर रोजी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीसंदर्भात सर्व नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.या बैठकीत जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने वेळोवेळी देण्यात येणारे प्रशिक्षण संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक घ्यावे.मतदान करताना मत अवैध ठरणार नाही,याबाबत मतदारांमध्ये आवश्यक जनजागृती करावी.निवडणुकीच्या निमित्ताने गठित करण्यात येणाऱ्या विविध पथकांनी अत्यंत दक्षतेने काम करावे.आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचे प्रभावी सनियंत्रण करण्यासाठी आवश्यक पथके गठित करावीत.आचारसंहिताविषयक दैनंदिन अहवाल तयार करून विहित नमुन्यात सादर करावा.भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने त्याच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी,असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.कटके यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले नोडल अधिकारी,त्यांचे सहायक अधिकारी तसेच संबंधित कक्षांनी पार पाडावयाच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती बैठकीत दिली.

निवडणूक प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पार पडण्यासाठी विविध अधिकाऱ्यांवर कक्षनिहाय जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.त्यामध्ये आदर्श आचारसंहिता कक्षासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,उपजिल्हाधिकारी श्रीमती. अरुणा गायकवाड (प्रशिक्षण कक्ष),जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे (वाहन परवाना व इतर परवाने वितरण कक्ष),निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,(कायदा व सुव्यवस्था कक्ष),उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके (वाहन व्यवस्था कक्ष ),उपजिल्हाधिकारी श्रीमती.स्वाती शेंडे (मतदान साहित्य कक्ष), उपजिल्हाधिकारी संतोष राऊत (मतदान साहित्य),उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर (मतपत्रिका तपासणी व वाटप), तहसीलदार प्रकाश व्हटकर (टपाली मतपत्रिका कक्ष),जम्बो मतपेटी कक्षासाठी तहसीलदार दत्तात्रय गायकवाड,माहिती व तंत्रज्ञान ॲप्लिकेशन कक्षाची जबाबदारी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अंकित सिंग,अवैध दारू वाटपास प्रतिबंध कक्षाची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्याकडे,मतदार मदत कक्षाची जबाबदारी तहसीलदार मृणाल जाधव यांच्याकडे,माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची जबाबदारी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्याकडे,स्वीप कक्षासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती.सुधा साळुंखे आणि नगरपरिषद प्रशासनाचे सहआयुक्त त्रिंबक डेंगळे यांच्याकडे मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधा,जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एच.एम.जगताप यांच्यावर मूलभूत सोयी सुविधाची,स्ट्राँग रूमची जबाबदारी धाराशिव उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांच्याकडे, निवडणूक निरीक्षक समन्वय कक्षाची जबाबदारी धाराशिव तहसीलदार मृणाल जाधव यांच्याकडे,खर्च व नियंत्रण कक्षाची जबाबदारी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य वित्त व लेखा अधिकारी ज्ञानराज पौड यांच्याकडे तर मतदानाची आकडेवारी संकलित करून विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्याची जबाबदारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांच्याकडे तर जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक कुमुद पांडा यांच्याकडे सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.या बैठकीला सर्व नोडल अधिकारी व त्यांचे कक्ष सहायक उपस्थित होते.