दीड महिन्यांपासून पावसाची दडी; ‘पायरीला’ किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत
धाराशिव | प्रशांत मते.

महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी हातातोंडाशी आलेले पीक संकटात सापडल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत असतानाच आता उभ्या उसाच्या पिकावरही ‘पायरीला’ किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
सोयाबीनच्या पिकाचे नुकसान, पावसाची प्रतीक्षा आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यातच शेतीच्या एकूण उत्पन्नात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऊस पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठे संकट उभे ठाकले आहे.
ऊस उत्पादकांच्या मते, ‘पायरीला’ किडीमुळे उसाच्या पिकावर विपरीत परिणाम होत असून पिकाची वाढ खुंटण्याची तसेच उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. काही भागांत किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना ऊस पीक वाचविण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. आधीच पावसाअभावी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता कीड नियंत्रणाचा खर्चही सहन करावा लागत असल्याने आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.
ऊस जगवायचा कसा, हा प्रश्न
पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. अशा परिस्थितीत उसाला पाणी देणे, खतांचा वापर करणे आणि किडीवर नियंत्रण मिळविणे ही तारेवरची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे ‘पिकाचे उत्पादन घटले तर नुकसान कसे भरून काढायचे आणि येणाऱ्या काळात ऊस जगवायचा कसा?’ असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
सोयाबीननंतर आता ऊस पिकावरही संकट ओढावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. नैसर्गिक संकट आणि पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव या दोन्हींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याने प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.
तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी
‘पायरीला’ किडीमुळे बाधित झालेल्या ऊस क्षेत्राची कृषी विभाग व महसूल प्रशासनाने तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार भरीव आर्थिक मदत आणि आवश्यक कीड नियंत्रणासाठी तांत्रिक मार्गदर्शन व उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोयाबीननंतर आता उसाचे पीकही संकटात सापडल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष मदतीच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.